वार्ताहर /पणजी
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त गोवा छायापत्रकार संघटना तसेच कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे आयोजित कार्यक्रमात यंदाच्या वर्षापासून छायापत्रकार संघटनेला नुतन कार्यालयाची भेट गोवा शासनातर्फे मिळाली आहे व याचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांच्या उपस्थित झाले.
छायापत्रकार संघटनेच्या 15 व्या वर्धापनदिन येथील डॉनबॉस्को हायस्कूल नजीकच्या पाठीमागील सरकारी गॅरेजमधील आपल्या नुतन कार्यालयात मोठय़ा उत्सहात साजरा केला. छायापत्रकार संघटना दरवर्षी शालेय पातळीवर तसेच खुल्या गटासाठी फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करीत असे. त्या राज्यातील विविध वर्तमान पेपरात काम करणारे छायाचित्रकार आपल्या उत्कृष्ट छायाचित्राचे प्रदर्शन भरवित असे. छायाचित्रांचे प्रेम्स तसेच इतर सामान ठेवण्यासाठी संघटनेकडे आपले स्वतःचे कार्यालय नव्हते. सरकारकडे नवीन जागा देण्याची मागणी संघटनेची अनेक वर्षाची होती. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सरकारी गॅरेजमध्ये कार्यालये देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी गॅरेजमध्ये कार्यालयासाठी जागा देऊन परीकराचे स्वप्न पूरे करून त्याच जागेत संघटनेला कार्यालय दिले.
या कार्यालयाचे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत सुशोभिकरण करण्यात आले व याचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. सावंत व सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. क्राबाल यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून करण्यात आले. छायापत्रकार संघटनेने घेतलेल्या फोटोग्राफी स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. छायाचित्रक्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या ज्येष्ठ छायाचित्रकार नारायण दिवकर आणि राजन उर्फ बाबुश गोलतकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिवकर यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बाबुश गोलतकर यांचे तीन दिवसापूर्वीच दुःखद निधन झाल्याने त्यांचा सत्कार नातेवाईक दिल राज माडगांवकर यांने स्विकारला. संघटनेचे अध्यक्ष तुळशिदास राऊळ यांनी स्वागत केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार गणेश शेटकर यांनी केले.
फोटोग्राफी स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालील प्रमाणे –
- शालेय पातळीवर प्रथम पारितोषिक ः- सनीक्षा उसगांवकर (बालभारती विद्यामंदिर, रायबंदर)
- दृतीय पारितोषिक ः- अभिषेक इनगालगे (सारस्वत विद्यालय हायस्कूल, म्हापसा)
- तृतिय पारितोषिक ः- उत्कर्ष नाईक (राजमाता पद्मावती राजे सौदेंकर, बांदोडा, फेडा)
- खास उत्तेजनार्थ बक्षिसे ः- झकिर मुल्ला (श्री गणेश हायस्कुल, म्हापसा) ऍड्रोय मिरांडा (फेयरीलेन्ड हायस्कूल भाटी – गोवा वेल्हा )
- खुला गट 2021 :- प्रथम पारितोषिक मांगिरीश यस फालकर (म्हार्दोळ-फोंडा) दृतीय पारितोषिक – विनय व्ही. गांवस (नावेली-साखळी)
- तृतिय पारितोषिक – महादेव सलाम (वाळपई – सत्तरी).
- खुलागट 2022 ः- प्रथम पारितोषिक – सिद्धेश शेटगांवकर (साखवाळ – कुठ्ठाळी)
- दृतीय पारितोषिक – ओमकार एम. गावडे (कुंकळय़े -म्हार्दोळ).
- तृतिय पारितोषिक – सुधीर धामस्कर (मडगांव)
- खास उत्तेजनार्थ – सोहम कुडव (कुंभारजुवा), चेतन वेळीप यांना प्राप्त झाली आहे.









