प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. खरेदीसाठी महिला दररोज मोठ्या संख्येने शहरात येत असतात. पण त्यांच्यासाठी पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे या समस्येचे निवारण करण्यासाठी जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम सखीच्यावतीने स्वच्छतागृह उभारण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. याकरिता बाजारपेठेत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे.
बेळगाव जिह्यासह महाराष्ट्र, गोवा या परराज्यांतील असंख्य नागरिक खरेदीसाठी किंवा इतर कारणास्तव शहरात येत असतात. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे खूपच कमी आहेत. असलेली स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जात नाही. दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने गांभिर्याने लक्ष देऊन या समस्येचे निवारण करणे आवश्यक आहे.
तरीदेखील सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि महिला आणि मुलींसाठी कार्य करणाऱ्या जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम सखीने या समस्येचे निवारण करण्याची तयारी दर्शविली आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या माऊती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, धर्मवीर संभाजी चौक, भाजी मार्केट अशा ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या जागा असतील तर त्यावर ‘बांधा, वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर खासकरून महिलांसाठी हायटेक स्वच्छतागृह बांधण्यासाठी तयारी दर्शविली आहे. महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा आशयाचे निवेदन जायंट्स सखीच्यावतीने महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले.
महापालिका आयुक्त उपलब्ध नसल्याने सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांना जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम सखीच्या अध्यक्षा चंद्रा चोपडे यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह गरजेचे असून आपण स्वत:हून पुढे आल्याबद्दल महिलावर्गाचे अभिनंदन करून सदर निवेदन महापालिका आयुक्तांसमोर ठेवून याबाबत आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन भाग्यश्र्री हुग्गी यांनी दिले.
यावेळी संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर, उपाध्यक्षा विद्या सरनोबत, सचिव सुलक्षणा शिनोळकर, सुवर्णा काळे, राजश्री हसबे, वृषाली मोरे आणि अर्चना कंग्राळकर उपस्थित होत्या.









