थर्मोन्युक्लियर आरएस-24 यार्स बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सादर
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये सध्या विजय दिन संचलनाची तयारी सुरू आहे. शहराच्या रेड स्क्वेअरमध्ये आण्विक क्षेपणास्त्रs संचलनाच्या तयारीत सामील झाली असून या प्रकाराला पाश्चिमात्य देशांसाठी एक खुले आव्हान म्हणून पाहण्यात येत आहे. विजय दिनी पुतीन युक्रेनवर अधिक भीषण हल्ल्यांची घोषणा करू शकतात असे मानण्यात येत आहे.
संचलनाच्या तयारीत रशियाचे महाविनाशक थर्मोन्युक्लियर आरएस-24 यार्स बॅलेस्टिक क्षेपणास्त्राला 16 चाकी वाहनांवर दिसून आले. हे क्षेपणास्त्र एकाचवेळी 10 वॉरहेडसह उड्डाण करण्यास सक्षम आहे. या आंतरखंडीय अस्त्राचे वजन 49.6 टन असून ते 12,000 किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा भेद करू शकते. काही मिनिटांमध्ये हे क्षेपणास्त्र लंडन आणि न्यूयॉर्क शहराला लक्ष्य करण्याची क्षमता बाळगून आहे.
संचलनाच्या तयारीदरम्यान आरएस-24 यार्ससोबत अनेक इस्कंदर-एम क्षेपणास्त्र लाँचरही दिसून आले. या संचलनाचे आयोजन सोमवारी होणार असून याकरता जोरदार तयारी सुरू आहे. क्रेमलिनबाहेर रशियाचे सैनिक देशाच्या ध्वजासोबत संचलन करताना दिसून आले. मॉस्कोच्या आकाशात 8 मिग-29 लढाऊ विमानांनी झेड आकार तयार केला.









