मंत्र्याला बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला मागे : अॅटर्नी जनरलकडून मागणार सल्ला
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवि यांनी गुरुवारी रात्री 7 वाजता कॅश फॉर जॉब घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले मंत्री सेंथिल बालाजी यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रात्री उशिरा त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे.
राज्यपालांनी बालाजी यांनी तत्काळ प्रभावाने मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याचा आदेश जारी केला होता. परंतु आता त्या निर्णयावरून त्यांनी घुमजाव केले आहे. राज्यपाल आता अॅटर्नी जनरलांकडून सल्ला मिळाल्यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. राज्यपाल रवि यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सल्ला मिळाल्यावर स्वत:चा निर्णय मागे घेतल्याचे समजते.
तर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राज्यपालांच्या निर्णयाला चुकीचे ठरवत याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे जाहीर केले होते. तर दुसरीकडे चेन्नईत द्रमुक मुख्यालयाबाहेर अनेक पोस्टर्स लावण्यात आली आहेत. खटल्यांना सामोरे जाणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना या पोस्टर्सद्वारे लक्ष्य करण्यात आले आहे.
सेंथिल तूर्तास मंत्रिपदी
राज्यपालांनी या मुद्द्यावर अॅटर्नी जनरलांशी सल्लामसलत केल्यावर स्वत:चा निर्णय रोखला आहे. बालाजी आता मंत्रिपदी कायम राहणार आहेत असे गुरुवारी रात्री उशिरा राज्यपालांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. सेंथिल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आहेत. 14 जून रोजी ईडीने त्यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने बालाजी यांनी 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राज्यपालांनी सेंथिल यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याशी चर्चा केली नव्हती असे बोलले जात आहे.
राज्यपालांना अधिकार नाही!
राज्यपालांना कुठल्याही मंत्र्याला बरखास्त करण्याचा अधिकार नाही. आम्ही त्यांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढू असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटले होते. सेंथिल बालाजी यांना बरखास्त करण्याचा राज्यपालांकडे घटनात्मक अधिकार आहे का? राज्यपाल रवि हे सनातन धर्मानुसार कार्य करत आहेत. परंतु सनातन धर्म आमच्या देशाचा कायदा नाही. राज्यपालांनी राज्यघटना नीट वाचावी अशी आमची विनंती आहे. त्यांच्याकडे अधिकार नसताना स्वत:च्या नेत्यांना खूश करण्यासाठी ते अशाप्रकारे काम करत असल्याचे वक्तव्य द्रमुक नेते सरवनन अण्णादुराई यांनी केले आहे.
सेंथिल सध्या तुरुंगात
मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर नोकऱ्यांसाठी पैसे घेतल्याचे आणि मनी लॉन्ड्रिंग समवेत भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे आहे. तसेच मंत्रिपदाचा दुरुपयोग करत ते चौकशीला प्रभावित करत आहेत. सेंथिल सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि अन्य कलमांखाली गुन्हेगारी प्रकरणी चौकशी सुरू आहे. अशा स्थितीत मंत्रिमंडळात सेंथिल बालाजी कायम राहिल्यास निष्पक्ष चौकशीसह कायदेशीर प्रक्रियेवर प्रभाव पडणार आहे. यामुळे राज्यातील घटनात्मक व्यवस्था कोलमडू शकते असे राज्यपाल भवनाकडून म्हटले गेले होते.









