वृत्तसंस्था/ शिकागो
येथे सुरु असलेल्या विश्व स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा अव्वल पुरुष स्क्वॅशपटू सौरव घोषालचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. टॉप सिडेड पेरूच्या दियागो इलियासने घोषालचा 5 गेम्समधील चुरशीच्या लढतीत पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
4 वर्षापूर्वी घोषालने विश्व स्क्वॅश स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. पण रविवारी शिकागोमधील या स्पर्धेत झालेल्या लढतीत 36 वर्षीय घोषालला इलियासकडून हार पत्करावी लागली. इलियासने ही लढत 11-9, 11-4, 6-11, 3-11, 12-10 अशा गेम्समध्ये जिंकून पुढील फेरीत स्थान मिळविले. घोषाल आणि इलियास यांच्यात आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या आहेत. गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या स्क्वॅश स्पर्धेत घोषालने इलियासला 5 गेम्सपर्यंत कडवी लढत दिली होती. 2016 साली घोषालने पेरुच्या इलियासवर शेवटचा विजय मिळविला होता. शिकागोमधील या स्पर्धेत भारताच्या महेश माणगावकर, रमित टंडन आणि अभय सिंग यांना पहिल्या फेरीतच हार पत्करावी लागली. महिलांच्या विभागात भारताच्या जोश्ना चिन्नाप्पाला पहिल्याच फेरीत अमेरिकेच्या ओलिव्हीया क्लीनेकडून पराभव पत्करावा लागला.









