तळेरे / प्रतिनिधी
गझलकार स्व.मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंतीनिमित्त तळेरे येथे “गझल नानिवडेकरांची” हा कार्यक्रम गुरुवारी प्रज्ञांगण परिवाराने आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रसिध्द गझलकार,कवी, उत्तम माणूस, मार्गदर्शक, पत्रकार आणि चांगला मित्र असे नानिवडेकर यांचे विविध पैलू मांडताना त्यांच्या अनेक गझलांचे सादरीकरण करण्यात आले. यानिमित्त नानिवडेकर यांच्या विविध आठवणींना उजाळा मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक श्रावणी कंप्यूटरचे संचालक सतिश मदभावे यांनी करताना म्हणाले की, पुढच्या पिढीला गझलकार मधुसूदन नानिवडेकर समजावेत. तळेरेसारख्या गावात एवढे मोठे गझलकार राहत होते. आणि त्यांचेही या गावावर अतोनात प्रेम होते. संपूर्ण महाराष्ट्राला माहित असलेल्या या साहित्य सुपुत्राचे साहित्य या पिढीला माहित व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर निकेत पावसकर यांनी नानिवडेकर यांची ओळख करुन देतानाच लेखक, अभिनेते प्रमोद कोयंडे यांनी नानिवडेकर यांच्या विविध गझला सादर केल्या. चांदणे नदिपात्रात, भलभलते, ठरावाप्रमाणे, हल्ली तू, तुझी याद येते अवेळी अवेळी आणि हरकत नाही अशा विविध गझला आणि एकंदरीत तळेरे येथील नानिवडेकर यांच्या आठवणी जागवल्या गेल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन श्रावणी कंप्यूटर आणि मेधांश कंप्यूटर यांच्या सहकार्याने प्रज्ञांगण परिवाराने आयोजित केला होता. यावेळी लेखक, अभिनेते प्रमोद कोयंडे, गवाणे विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक ए. एच. मुल्ला, पत्रकार संजय खानविलकर, संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर, श्रावणी कंप्यूटर एज्युकेशनचे संचालक सतिश मदभावे, सौ.श्रावणी मदभावे, सौ.विश्रांती कोयंडे, चित्रकार मृण्मयी पांचाळ, स्मितेश पाष्टे यांच्यासह श्रावणी कंप्यूटर आणि मेधांश कंप्यूटर एज्युकेशनचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रणाली मांजरेकर तर आभार सौ.श्रावणी मदभावे यांनी मानले.








