राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या प्रयत्नांना यश
बेळगाव : बेळगावमधून धावणाऱ्या पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला जिल्ह्यात एखादा थांबा द्यावा, अशी मागणी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्र्यांकडे केली होती. वंदे भारत एक्स्प्रेसला मागील दोन महिन्यांत उत्तम प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील नागरिकांना या एक्स्प्रेसचा लाभ घेता यावा यासाठी घटप्रभा येथे थांबा देण्याबाबत रेल्वे बोर्डने मंजुरी दिली आहे. बेळगाव जिल्ह्यात केवळ बेळगाव रेल्वेस्थानकात वंदे भारत एक्स्प्रेस थांबत होती. परंतु, प्रवाशांच्या सोयीसाठी घटप्रभा रेल्वेस्थानकावर काहीवेळासाठी वंदे भारत थांबावी, अशी मागणी होत होती. या मागणीची दखल घेत रेल्वे बोर्ड, तसेच रेल्वेमंत्र्यांनी घटप्रभा रेल्वेस्थानकावर थांबा देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे घटप्रभा, गोकाक, रायबाग या परिसरातील रेल्वे प्रवाशांना वंदे भारतचा प्रवास करणे सोयीचे होणार आहे. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.









