बेळगाव : माझी मराठी प्रतिष्ठान व संत कुटुंबीय यांच्यावतीने कवयित्री इंदिरा संत यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त ‘घर माझे चंद्रमौळी’ हा कार्यक्रम आयएमईआर येथे पार पडला. अभिनेत्री व लेखिका असणाऱ्या मुग्धा गोडबोले व मधुराणी गोखले यांनी हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला रसिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली.सालाबादप्रमाणे या दोन्ही संस्थांच्यावतीने एसएसएलसी परीक्षेत सीमाभागात सरकारी मराठी शाळेतील जी विद्यार्थिनी मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळविते तिला व तिच्या शिक्षकांना रोख पारितोषिक देण्यात येते.
यंदा कॅन्टोन्मेंट शाळेची विद्यार्थिनी राजश्री परशुराम पाटील व तिचे शिक्षक महेश कुंभार आणि मराठी विद्यानिकेतनची विद्यार्थिनी संस्कृती राम गुरव व तिचे शिक्षक बी. एम. पाटील यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी अश्विनी तेरणीकर व पत्रकार मनीषा सुभेदार यांचाही संत कुटुंबीयांतर्फे सत्कार करण्यात आला. प्रारंभी वीणा संत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रवींद्र संत तसेच पाहुण्यांच्या हस्ते इंदिरा संत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याच कार्यक्रमात लोकमान्य ग्रंथालयाला संत कुटुंबीयांतर्फे शंभर पुस्तके भेटीदाखल देण्यात आली. तसेच कार्यक्रमाच्या सादरकर्त्या मधुराणी गोखले व मुग्धा गोडबोले यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आसावरी भोकरे यांनी केले.









