विजय भिके यांचा इशारा, म्हापशातील जनता दरबार हास्यास्पद
म्हापसा : राज्यात सर्वत्र धो-धो पाऊस पडत असतानाही बार्देश तालुक्यात सलग 3 दिवस पिण्याचे पाणी नाही. नळ कोरडे पडले आहे. कुठे ती घर घर जल, कुठे त्या योजना आणि कुठल्या त्या चर्चा आणि आज जनता दरबार या फसवणुकीच्या गोष्टी झाल्या आहेत. बुधवार सकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही काँग्रेस कार्यकर्ते म्हापसा पाणीपुरवठा विभागावर घागर मोर्चा नेणार असल्याचा इशारा काँग्रेस पक्षाचे नेते विजय भिके यांनी म्हापसा येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. अभियंत्यास फोन लावल्यास अस्नोडा प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पंप योग्य चालत नाही. तसेच विजेच्या समस्यामुळे पाणी येत नाही, अशी उत्तरे ऐकावयास मिळत आहेत. धो-धो पावसात नळ कोरडे पडले आहेत. बुधवार सकाळपर्यंत आम्हाला पाणीपुरवठा न झाल्यास आम्ही काँग्रेस कार्यकर्ते म्हापसा पाणी पुरवठा विभागावर घागर मोर्चा नेणार असल्याचे भिके यांनी सांगितले. म्हापशात सोमवारी झालेला जनता दरबार हास्यास्पद आहे. निवडणूक जवळ आली म्हणून हा जनता दरबार आहे. या दरबारात त्यांचेच लोक होते. खरोखरच नागरिकांच्या समस्या जाणून घ्याच्या असल्यास जनता दरबार रविवारी सुट्टीच्या दिवशी घ्या. असे फसवणुकीचे दरबार बंद करा व जनतेच्या मुख्य समस्यांकडे लक्ष द्या, असे विजय भिके म्हणाले.









