चिपळूण :
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश न आल्याने आता पक्षांतर्गत फेरबदल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातूनच जिल्ह्यात काँग्रेसनेही दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले असून उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी येथील सोनललक्ष्मी घाग तर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी लांजा येथील नुरुद्दीन सय्यद यांची निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्लीतून ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणूगोपाळ यांनी राज्यातील 13 जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील निवडींचा समावेश आहे. तत्कालीन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसने त्यांची हकालपट्टी केली होती. तेव्हापासून जिल्हाध्यक्षपद रिक्त होते.
- प्रथमच दोन जिल्हाध्यक्ष
इतर राजकीय पक्षांप्रमाणेच काँग्रेसनेही दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त करत त्यांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. यामध्ये जिल्ह्यात काँग्रेसची धुरा प्रथमच एका महिलेच्या हाती देण्यात आली आहे. घाग या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. त्यांनी यापूर्वी युथ काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदावर काम केले आहे.
दरम्यान, जिल्हाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल बोलताना सोनललक्ष्मी घाग म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना घेऊन जाणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने आपल्यावर जो विश्वास दाखवला तो आपण सार्थक लावण्याचा प्रयत्न करणार आहे. पक्ष वाढवण्यासाठी तळागाळापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.








