एलअँडटी कंपनीत कार्यरत असलेल्या 38 कामगारांची मागणी
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेने शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी एलअँडटी कंपनीवर सोपविली आहे. महापालिकेकडे 25 वर्षांपासून 38 जण व्हॉल्व्हमॅन आणि पंप ऑपरेटर म्हणून काम करत होते. ते आता चार वर्षांपासून एलअँडटी कंपनीकडे काम करत आहेत. मात्र नोकरीत सेवा सुरक्षा नसून वेतनदेखील वेळेत मिळत नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा महापालिकेत समाविष्ट करून घ्या, अशा मागणीचे निवेदन एलअँडटीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी मंगळवार दि. 25 रोजी महापालिका आयुक्त आणि महापौरांना दिले.
यापूर्वी बेळगाव महानगरपालिकेकडे शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी होती. गेल्या 25 वर्षांपासून 38 जण व्हॉल्व्हमॅन व ऑपरेटर म्हणून काम करत होते. मात्र गेल्या चार वर्षांपासून पाणीपुरवठ्याची जबाबदारी एलअँडटी या खासगी कंपनीकडे सोपविण्यात आल्याने 38 जण कोणत्याही प्रकारची सेवा सुरक्षा नसताना काम करत आहेत. कामगारांना वेतन वेळेत मिळत नाही, याबाबत विचारणा केली असता व्यवस्थित उत्तर दिले जात नाही. मिळणाऱ्या वेतनात समानता नाही. महापालिकेचे कर्मचारी समजून त्रास दिला जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या 38 कामगारांना पुन्हा महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.









