खासदार सदानंद शेट तानावडे यांचे आवाहन
भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
पणजी प्रतिनिधी
जिल्हा पंचायत सदस्यांनी गोवा भाजपने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यसभा खासदार तथा भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले.
दोनापावल येथील इंटरनॅशनल सेंटर येथे गोवा, केरळ, लक्षद्वीप आणि तामिळनाडू या राज्यातील भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे लक्षद्वीपचे अध्यक्ष कशमी, प्रशिक्षण शिबिराचे समन्वयक गोविंद पर्वतकर, सरचिटणीस दामू नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार शेट तानावडे म्हणाले की, या शिबिरात विविध विषयांवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विचारांची देवाणघेवाण करणार आहेत. या दोन दिवशीय शिबिरात उपस्थित जिल्हा पंचायत सदस्यांनीही आपले विचार मांडावेत. काही प्रश्न, समस्या आणि अडचणी असतील तर त्याही मांडाव्यात, असे ते म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला भरभरून यश मिळावे. यासाठी जिल्हा पंचायत सदस्यांचे योगदान व्हावे यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे ते म्हणाले.
पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांसह नेत्यांनी आणि जिल्हा पंचायत सदस्यांनी मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत केलेली विकासकामे, पक्षाची विचारधारा आणि पक्षाचा इतिहास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन खासदार शेट तानावडे यांनी यावेळी केले.









