अमेरिकेतील राजकीय नेत्याच्या वक्तव्यामुळे गदारोळ
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील राजकीय नेते चँडलर लॅँगविन यांना भारतीयांसंबंधी केलेल्या वादग्रस्त टिप्पणींमुळे टीकेच्या भडिमाराला सामोरे जावे लागत आहे. फ्लोरिडातील नेत्याला त्याच्या वादग्रस्त टिप्पणींसाठी सिटी कौन्सिलने फटकारले आहे. फ्लोरिडाच्या पाम बे सिटी कौन्सिलने लँगविन यांना वादग्रस्त टिप्पणींसाठी 3-2 अशा मतांनी प्रतिबंधित केले आहे. सिटी कौन्सिलच्या या निर्णयामुळे लँगविन यांना आता कुठल्याही मुद्द्याला अजेंड्यात सामील करण्यापूर्वी सर्वसहमती निर्माण करावी लागणार आहे. याचबरोबर निंदा प्रस्तावाच्या अंतर्गत लँगविन यांना आयुक्तांविषयी टिप्पणी करण्यापासून रोखण्यात येईल आणि त्यांना समित्यांपासून हटविले जाणार आहे.
कौन्सिलर चँडलर लँगविन यांनी एका पोस्टमध्ये अमेरिकेतून भारतीयांना हाकलण्याचे आवाहन केले होते. एकही भारतीय अमेरिकेची पर्वा करणार नाही. भारतीय येथे आमचे आर्थिक शोषण करणे आणि भारत तसेच भारतीयांना समृद्ध करण्यासाठी आले आहेत. अमेरिका केवळ अमेरिकन्स लोकांसाठी असल्याची पोस्ट त्यांनी केली होती. परंतु टीका झाल्यावर त्यांनी स्वत:ची पोस्ट डिलिट केली आणि भारतीय-अमेरिकन समुदायाबद्दल नव्हे तर व्हिसाधारकांना उद्देशून पोस्ट केली होती अशी सारवासावर त्यांनी केली आहे.
एका अन्य पोस्टमध्ये लँगविन यांनी भारतीय अमेरिकेचा लाभ उचलत असल्याचा आरोप केला. ही पोस्ट भारतात जन्मलेला ट्रकचालक हरजिंदर सिंहविषयी होती, हरजिंदरने फ्लोरिडात चुकीचा यू-टर्न घेतल्याने तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर 2 ऑक्टोबर रोजीच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लँगविन यांनी सर्व भारतीयांचा व्हिसा रद्द करण्याची मागणी केली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व भारतीयांचा व्हिसा रद्द करत त्यांची देशातून हकालपट्टी करावी असे लँगविन यांनी नमूद केले होते.
लँगविन यांच्या टिप्पणींना पाम बे सिटी कौन्सिलने कठोर शब्दांत विरोध केला आहे. अमेरिकेची स्थापना ही स्थलांतरितांच्या बळावर झाली होती. आम्ही सर्व हा ध्वज, आमचा बॅनर, अमेरिकेच्या मूळ स्वरुपाचा हिस्सा असल्याचे उद्गार सिटी कौन्सिलचे सदस्य महापौर रॉब मेडिना यांनी काढले आहेत.
लँगविन यांचे स्पष्टीकरण
माझा उद्देश स्थलांतर धोरणांवर एक चर्चा सुरू करणे आहे. अशाप्रकारचा ट्विट केलेला मी पहिला रिपब्लिकन नाही. सिटी कौन्सिलने मला पदावरून हटविण्याची केलेली मागणी निंदनीय असून वेगळे मत राखणाऱ्यांना दडपण्याचा हा प्रकार आहे. मी स्वत:चे पद सोडणार नसल्याचे लँगविन यांनी स्वत:च्या टिप्पणींचा बचाव करत म्हटले आहे.









