अजूनही अंधश्रद्धेचा विळखा कायम : उतारा टाकणारे देखील आता सीसीटीव्हीत होत आहेत कैद : शहरातील विविध चौकांमध्ये घडताहेत प्रकार
बेळगाव : एकमेकाबद्दलची इर्षा… चढाओढ…..पोटदुखी…..आणि जीवघेणी स्पर्धा तसेच स्वार्थाचे राजकारण याला अंधश्रद्धेची जोड आली की माणसातील अतिशय खालच्या मनोवृत्तीचे दर्शन घडते. आज विज्ञान युगाची भाषा होत असताना करणीबाधेचे चित्र सुन्न करून जाते. या प्रकाराने संबंधिताला काय साध्य होते? हा संशोधनाचा विषय असला तरी माणसामधील एक विकृतीच मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागली आहे. शहरातील विविध चौकांमध्ये करणीबाधेचे साहित्य नेहमीच नजरेला येते. त्यामुळे आपण 21 व्या शतकात वावरत असलो तरी अजूनही अंधश्रद्धेचा विळखा सुटला नाही. हे स्पष्ट दिसून येते. पॅम्प येथे एका बंगल्याशेजारी सातत्याने करणी करण्याचा प्रकार सुरू आहे. पॅम्प येथे सेंटपॉल्स हायस्कूलजवळ चॅपेल रोड येथे एका बंगल्या शेजारी गत काही महिन्यापासून सातत्याने करणीचा प्रकार सुरू आहे. एक जोडपे येऊन रात्रीच्यावेळी असे कृत्य करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू असून खळबळ माजली आहे.
मानसिकता बदलण्याची आवश्यकता
किमान पंधरवड्यातून एकदा या ठिकाणी असा प्रकार घडत आहे. या ठिकाणी संबंधित नागरिकांनी सीसीटीव्ही बसवले आहेत. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे प्रकार कैद झाले आहेत. याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आम्ही 21 व्या शतकात वावरत आहोत. या शतकात विज्ञानाने उंच भरारी मारली आहे. अनेक वेगवेगळे नवे शोध लागले आहेत, तर मंगळावरही भारताने यान पाठविले आहे. इतकी प्रगती झाली असताना मात्र काहीजण अजूनही अंधश्रद्धेसारख्या विळख्यातून बाहेर पडण्यास तयार नाहीत. अजूनही नागरिकांची मानसिकता बदललेली दिसत नाही.
अंधश्रद्धेवर जनतेचा अजूनही विश्वास
शहराच्या चौकात, ग्रामीण भागात, गावातील वेशीत, तीन रस्ते मिळालेल्या ठिकाणी चक्क हजारो ऊपये किमतीचे करणीबाधेचे साहित्य टाकण्यात येते. एखाद्याचे वाईट करण्यासाठी इतका खर्च करण्याऐवजी आपण चांगल्या मार्गाने प्रयत्न करून दुसऱ्या पेक्षा पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारायला हवा. याकडे संबंधित करणीप्रेमींचे लक्ष वेधण्याची गरज वाटते. अमावस्या आणि पौर्णिमा जवळ आली की हे चित्र हमखास सर्वांनाच पहावयास मिळते. महत्त्वाचे म्हणजे अंधश्रद्धाविरोधी कायदा करावा म्हणून एकीकडे झगडले जाते. असे असताना चौकातील स्थिती मात्र अंधश्रद्धेवर जनतेचा अजूनही विश्वास आहे हे दुर्दैवी चित्रच सामोरे आणू लागले आहे.
इतरांना मदत करण्याची भावना आवश्यक
करणीसाठी आपला नंबर लागावा म्हणून थंडी, पाऊस याची तमा न बाळगता कशीबशी रात्र हे अंधश्रद्धाळू घालवितात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते भोंदूबाबा दहीभात, भडंग, भेळपासून चक्क उलट्या पंखाच्या कोंबड्यापर्यंत लांबलचक यादी करून त्या अंधश्रद्धाळूच्या हाती देतात. नुकत्याच एका मार्गावर पडलेल्या उताऱ्यामध्ये केळी, सफरचंद, कोवाळा, तब्बल एक डझन अंडी, चिरमुरे, बत्ताशे, लिंबूंचा मोठा हार, देवीची पडली या वस्तूंचा समावेश आहे. ज्या वस्तू या अंधश्रद्धेतून फेकल्या गेल्या आहेत. त्या वस्तूमधून किमान दहा ते 15 व्यक्तींना सहज जेवण देणे शक्य झाले असते. इतक्या मोठ्या प्रमाणात हा उतारा असल्याने भोंदूबाबाही नामांकितच असणार, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. यामुळे त्यानेही या अंधश्रद्धाळू व्यक्तींकडून चांगलीच रक्कम उकळली असावी, यात शंकाच नाही. गरीबाला मदत करणे किंवा इतरांना सहकार्य करण्याची भावना असली तर अशाप्रकारे करणीबाधा करण्याचा प्रश्नच उद्भणार नाही. मात्र अजूनही अनेकांची मानसिकता बदलली नसल्याचे दिसून येत आहे. खरोखरच अशाप्रकारे करणीबाधा करून कोणी यशस्वी झाले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अंधश्रद्धेचे पेव अजूनही समाजात मोठ्या प्रमाणात ऊढ आहे ही गंभीर बाब आहे. शहरांपासून जवळच अनेक खेड्यांमध्ये बरेच भोंदूबाबा राजरोसपणे सर्वसामान्य जनतेची अक्षरश: दिशाभूल करत आहेत. बऱ्याचवेळा बळी देण्याचा गंभीर प्रकारही घडला आहे. अशा घटना या समाजघातक असून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या भोंदूबाबांविरोधात कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
सुसंस्कारित माणसांची संख्या वाढण्याची गरज
करणीबाधा करण्याची सूचना करणारे भोंदूबाबा जेथे राहतात त्या ठिकाणी चक्क चारचाकी वाहनांतून फिरणारेच अधिकजण दिसत आहेत. या भोंदूबाबांकडे जाण्यासाठी भल्या पहाटे उठून रांग लावावी लागते. काहीजण तर भोंदूबाबाच्या घराशेजारीच आदल्या दिवशी वस्ती ठोकतात. यामुळे फक्तच अडाणी नव्हे तर स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारेही या प्रकारात आघाडीवर असल्याचे दिसून येऊ लागले आहे. यामुळे एकवेळ सुशिक्षित नको मात्र सुसंस्कारित माणसांची संख्या वाढण्याची गरज असल्याचे मत काहीजण व्यक्त करतात.









