ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत आज ओपन जीपमधून मातोश्रीबाहेर शिवसैनिकांशी संवाद साधला. राज्यात कपट कारस्थाने सुरू आहेत. ज्या पद्धतीने कपट कारस्थाने करत त्यांनी आपले शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह चोरांना दिले गेले, त्याच पद्धतीने ते कदाचित आपले मशाल चिन्ह सुद्धा काढू शकतील. त्यामुळे तुम्ही निवडणुकांच्या तयारीला लागा. या निवडणुकीत चोरांच्या आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून त्यांच्या छाताडावर उभे राहिल्याशिवाय शांत बसायचे नाही, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाने आपला पवित्र धनुष्यबाण चोरांना दिला. धनुष्यबाण चोरणारे मर्द असतील तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन यावे, मी मशाल घेऊन येतो. बघू काय होतं. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला मात्र तो उताणा पडला. या चोरांनाही धनुष्यबाण पेलता येणार नाही. धनुष्यबाण गेला पण मी खचलो नाही आणि खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून त्यांच्या छाताडावर उभा राहीन.
अधिक वाचा : शिंदे गटाचा ‘सोशल मीडिया स्ट्राईक’
तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा. आपण पुन्हा एकजुटीने लढू. चोरांचा आणि चोरबाजाराचा नायनाट करू. शिवसेना संपवण्याचा डाव सुरू आहे. मात्र, शिवसेना संपवता येणार नाही.








