सांप्रतच्या काळात अनेक देशांना घटत्या लोकसंख्येच्या समस्येने ग्रासले आहे. विशेषत: जे देश आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न आहेत, त्या देशांमध्ये या समस्येने उग्र स्वरुप धारण केले आहे. एकीकडे ‘गरीब’ देशांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, दुसरीकडे धनवंत देश मात्र, ‘वृद्ध’ होत आहेत.
त्यामुळे, महिलांनी अधिकाधिक मुले जन्माला घालावीत, यासाठी या देशांनी अभिनव योजना आणल्या आहेत. सध्या दक्षिण कोरिया या देशातील एक योजना चर्चेचा विषय बनली आहे. ज्या महिला मुलांना जन्म देण्यास राजी आहेत, त्यांना गर्भवती अवस्थेपासूनच या देशात मोठ्या प्रमाणात धन दिले जाते. ते लाखो रुपयांमध्ये असते. त्यांना वैद्यकीय सल्ला आणि उपचार, तसेच अन्य सुविधा सरकारच्या वतीने दिल्या जातात. गर्भवती झाल्यापासून ते अपत्याचा जन्म होईपर्यंत त्यांना अनेक सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो. गर्भवती असताना साधारण: दोन लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येते. अपत्याचा जन्म झाल्यानंतर त्यांना ‘पारितोषिक’ म्हणून जवळपास सव्वा लाख रुपयांची रक्कम देण्यात येते. अपत्याचा जन्म झाल्यानंतर एक वर्षभर त्यांना महिन्याला 63 हजार तर त्यानंतर पुढचे 1 वर्ष त्यांना प्रत्येक महिन्याला 31 हजार रुपयांची रक्कम मानधन म्हणून मिळते. तसेच दोन वर्षे ते आठ वर्षे अशी सहा वर्षे त्यांना प्रत्येक महिन्याला 12 हजार रुपयांची रक्कम मिळत मिळते. अशा प्रकारे, गर्भवती झाल्यापासून अपत्य आठ वर्षांचे होईपर्यंतची रक्कम 20 लाखांहून अधिक आहे.









