अनेक देशांसंबधी अनेक अजब समजुती समाजात पसरलेल्या असतात, हे आपल्याला माहिती आहे. हे समज खोटे आहेत की खरे याची शहानिशा करुन न घेताच त्यांवर विश्वास टाकला जातो. कारण आपल्यापैकी असंख्य लोकांना अशा समजुतींचे आकर्षण असते. त्या कितीही आतर्क्य असल्या, तरी त्या अनेकांच्या मनातून कधीही जात नाहीत, हे तितकेच खरे असल्याचे दिसते.
आईसलँड नामक देशासंबंधी अशीच एक गोड समजूत आहे. या देशातील तरुणीशी कोणीही विवाह केल्यास त्याला तेथे सरकारी नोकरी दिली जाते, अशी ही समजूत आहे. या देशात पुरुषांची अत्यंत कमतरता आहे. त्यांची संख्या कमी असल्याने ते या देशात यावेत अशी तेथील प्रशासनाची इच्छा असते. त्यामुळे तरुणांची संख्या वाढविण्यासाठी ही अत्यंत आकर्षक ऑफर देण्यात आली आहे, असेही सांगण्यात येते. म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन असाच हा प्रकार असल्याचे समजुतीत आहे. पण खरेच असे आहे काय, याचा शोध काहीजणांनी घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी असे दिसून आले की या देशात पुरुषांची आणि महिलांची संख्या जवळपास समान आहे. म्हणजेच पुरुषांची संख्या बरीच कमी आहे ही समजूत चुकीची ठरली. तसेच सरकारी नोकरीसंबंधी जे सांगितले गेले तीही केवळ अफवाच ठरली. त्यामुळे जाणकारांनी आता असे स्पष्ट केले आहे, की कोणीही विवाहेच्छू किंवा नोकरीइच्छुकाने यावर विश्वास ठेवू नये. नोकरी आणि छोकरी अशी दोन्ही स्वप्ने या समजुतीने पूर्ण होणार नाहीत, असा स्पष्ट संदेश सत्यपडताळणी करणाऱ्यांनी संशोधनाअंती दिला आहे.