श्यामलाची मुलगी शाल्मली जुने अल्बम काढून बसली होती. ‘ए मम्मा कशी दिसत होतीस गं तू त्यावेळी…वेगळीच..’
‘म्हणजे?’
‘ते जाऊ दे पण मला सांग, या फोटोंमध्ये तू खूष दिसत नाहीस. डॅडा बघ कसा हसतोय.’
‘हं…तुझ्या लक्षात आलं तर..अगं मला खरंच कंटाळा आला होता. खरं म्हणशील तर ज्या ठिकाणी गेलो होतो ते ठिकाण फारसं आवडीचं नव्हतं माझ्या. नुसत्या दऱया नी डोंगर. चालायचेच चालायचे. पार दमून गेले होते मी. केव्हा घरी येतोय असंच झालेलं मला त्यावेळी’.
अगं…मग मनाविरुद्ध गेलीस कशी तू मम्मा, नाही म्हणायचं ना स्पष्ट.’
‘ते तुला आत्ता नाही कळणार.’ श्यामला हसून म्हणाली. ‘तुझं लग्न झालं ना बेटा की कळेल.’ आईने थोडी लेक्चरबाजी सुरू केल्यावर शाल्मली वैतागली. ‘नो, नो, नॉट ऍट ऑल. मला नाही असलं जमणार. तू म्हणजे धन्य आहेस. सारखी नुसती ऍडजेस्टमेंट. तुम्ही बायकाच वेगळय़ा. नवऱयाची मर्जी राखायला कशाला तडजोड पाहिजे. उगीचच धडपडायचं. मी तुझ्या जागी असते तर ‘जमणार नाही’ म्हणून स्पष्ट सांगितलं असतं.. काय ते मॅडसारखं. नवरा म्हणेल तसं..’
‘अगं शाल्मली हो हो. तुझ्या डॅडाने काही सक्ती केली नव्हती की बंदूक रोखली नव्हती माझ्यावर, इथेच जायचं म्हणून. मला ‘नाही म्हणायचं स्वातंत्र्य होतं’ आणि आजही आहे. मी त्यांच्याबरोबर गेले कारण मला त्यांचं मन मोडायचं नव्हतं’ ती आपला मुद्दा पकडत म्हणाली. ‘सगळय़ा गोष्टी केवळ आपल्याच आनंदासाठी नसतात करायच्या. मला डोंगर दऱयातून हिंडायला फार आवडत नाही हे खरं. पण तुझ्या डॅडाला टेकिंगची खूप आवड. त्याने ती ट्रिप खूप एन्जॉय केली. तो इतका खुश होता की त्याच्या चेहऱयावरचा आनंद बघून मला समाधान वाटत होतं. अगं, त्यालाही माझ्या अनेक गोष्टी पटत नाहीत परंतु तोही माझं मन राखण्यासाठी धडपडतोच की!’
शाल्मलीच्या डोक्मयात काही केल्या हे शिरेना. ती वैतागून म्हणाली. ‘मम्मा कसलं काय. तुझी ही संसाराची अजब थिअरी मला नाही पटत’.
‘शाल्मली, केवळ संसारातच नव्हे, जीवनात अनेकदा तडजोड करावी लागते. नाहीतर नाती टिकणारच नाहीत. मोल्ड व्हावं लागतं बाळा..’
‘शिट यार…नो लेक्चर मॉम…ते लग्न नको नी दुसऱयाच्या तालावर नाचणंही नको’ म्हणून शाल्मली तणतणत निघून गेली.
खरंतर केवळ लग्न, संसार नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येकालाच आयुष्याच्या कुठच्या ना कुठच्या टप्प्यावर ‘तडजोड’ करावी लागते. व्यक्तिगत जीवन असो वा नातेसंबंध जोपासताना असो किंवा प्रश्न व्यावसायिक निर्णयाचा असो अनेकदा समजुतीने, शहाणपणाने आणि कौशल्याने प्रश्न हाताळले तर समस्या उद्भवण्याची शक्मयताच कमी होते.
अर्थात तडजोड कसली आणि किती मोठी यावर बरेच काही अवलंबून असते. चार दिवस फिरायला कुठे जायचे यासाठी थोडी तडजोड करणे आणि तिने त्याच्या चेहऱयावरचा आनंद पाहणे यात वावगे काहीच नाही. वैवाहिक नात्यामधे ‘मी आणि तू’ चे ‘आपण’ होण्यापर्यंतचा प्रवास सोपा करायचा असेल तर कधी त्याने तर कधी तिने आपला हट्ट सोडत एकमेकांना समजून घेत प्रवास करावा लागतो.
अलीकडच्या काळात थोडं मनाविरुद्ध झालं तरी सतत ‘अहं’चा विषाणू मध्ये आल्याने कुरबुरी वाढत जाऊन घटस्फोटापर्यंतचा प्रवास पटकन होताना दिसतो.
तडजोडीची तयारी नसली की सारे अवघड होऊन बसते.
बदलत्या संकल्पना, क्षुल्लक कारणांवरून मतभेद, मीच का करायचं हा जोडप्यांमधला प्रश्न, सतत मध्ये येणारा अहंकार, तुझे माझे या आणि यासारख्या अनेक गोष्टींवरून जोडप्यांमधील मतभेद मनभेदापर्यंत प्रवास करतात आणि यामध्ये अखेर दोन्ही कुटुंबे भरडली जातात.
लग्न केलं की ते आपोआप यशस्वी होत नाही. केलेलं लग्न टिकविण्यासाठी मनाची, वेळेची, समजून घेण्याची, संयमाची गुंतवणूक करावी लागते. सहजीवनाची वाटचाल करत असताना येणारे टप्पे, जीवनातील चढउतार हे दोघांनीही समजून घेत वाटचाल करावी लागते. परिस्थिती बदलते तसा मानसिक-भावनिक गरजांचा पोतही बदलतो. त्याबद्दल परस्पर संवाद हवा. जोडीदाराला हे सांगताना त्याचेही ऐकून घेणे महत्त्वाचे ठरते. एकंदरच विवाह, त्या अनुषंगाने उद्भवणाऱया समस्या घेऊन अनेक जण भेटत असतात.
त्या दिवशी मला भेटायला आलेला नील म्हणाला, ‘मॅडम, पारंपरिक पुरुषी वर्चस्वाचे संस्कार आताची आम्ही मुले बाजूला सारू लागलोय. जेंडर रोलचा पगडा योग्य नाही हे आम्हालाही कळतं आता. कामातले शेअरिंगसुद्धा किती गरजेचे, महत्त्वाचे आहे हे आमची पिढीही शिकतेय, समजूनही घेते आहे. परंतु तरीही काही ‘त्या’ आम्हाला जणू खलनायकच समजतात. समवयस्क मित्रांच्या आयुष्याचे कित्ती किस्से सांगू तुम्हाला. चांगुलपणाकडेसुद्धा काहीतरी ‘पुरुषी कावाच’ असेल अशा संशयाने बघणाऱयाची संख्या आजही कमी नाही. पुरुष असेच असतात असे लेबल आजही लावणाऱयांचीही संख्या कमी नाही. वाईट वाटतं अशावेळी.
आमची पिढी बदलते आहे. सपोर्टिव्ह आहे तरीही एकेकदा व्यक्तीस्वातंत्र्याचा एवढा अतिरेक पहायला मिळतो की ‘जुळवून घेणे’ हे मान्यच नसते. मॅडम लग्न हे एकच नातं नसतं ना. अगदी आई, वडील, मुले, मित्र-मैत्रिण सगळय़ा ठिकाणी एकमेकांना समजून घेऊनच पुढे जावं लागतं ना हो. कुठल्याही प्रसंगात दोघेही एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ही भावनिक आधाराची गरज प्रत्येकालाच असते ना?’
‘..हं..खरं आहे.’
‘कधीच कुणावाचून अडणार नाही इतके जर आपण स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण असू तर लग्न करूच नये. लोकांचे कशाला माझी बहीण युक्ता आणि आमचे धाकटे बंधुराज मानस या दोघांनाही परवाच सांगितले. व्यक्तीस्वातंत्र्याचा पराकोटीचा अट्टहास असेल तर लग्न हवे कशाला तुम्हाला? एवढे स्वयंसिद्ध आहात तर पार्टनरचा अट्टहास कशाला. मॅडम, दोघांनी एकमेकांना समजून घ्यावं, प्रत्येकाला आपली आवड जपायची मुभा हवी वगैरे सगळं बरोबर..पण तुझं माझं…याचा अतिरेक झाला की अवघडच होतं ना हो. नातं पक्कं व्हायला दोन्ही बाजूनी प्रयत्न हवेतच. लग्न नुसतं रजिस्टर झालं की संपलं का सगळं.’ नील..भडाभडा बोलत होता. त्याचे अनेक मुद्दे विचार करायला लावणारे होते.
आजच्या काळातली लगीनगाठ खरंच सोपी राहिली नाही. लग्न झालं हुश्श..असे करून चालणार नाही. नाते टिकविण्याच्या आणि समृद्ध करण्याच्या दृष्टीने दोघांनाही मेहनत घ्यावी लागेल. लग्न केवळ कागदोपत्री रजिस्टर असून चालणार नाही तर या नात्यामधे विचाराची, आचाराची, तडजोडीची, समजून घेण्याची, संयमाची नोंद दोन्ही बाजूंनी कशी होते आहे हेही फार महत्त्वाचे आहे. अर्थात या विषयाला बऱयाच बाजू आहेत याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात…
ऍड. सुमेधा संजीव देसाई








