खासदार इराण्णा कडाडी यांची बँक अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव
सर्वसामान नागरिक, सुशिक्षित बेरोजगार, महिला स्व-सहाय्य संघ आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांचे प्रलंबित अर्ज त्वरित निकालात काढून योजनांचा लाभ करून द्यावा, अशी सूचना खासदार इराण्णा कडाडी यांनी बँक अधिकाऱ्यांना केली.
येथील जिल्हा पंचायत सभागृहामध्ये विविध बँक अधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय सल्ला समिती आणि समीक्षा समिती बैठकीमध्ये ते बोलत होते.
ग्रामीण भागातील जनतेच्या आर्थिक सबलीकरणासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्या योजनांचा लाभ विलंब न करता पात्रताधारक अर्जदारांना करून देण्यात यावा. जिल्ह्यातून नवीन बँक सुरू करण्यासाठी नागरिकांकडून अर्ज दाखल करण्यात येत आहेत. यासाठी आवश्यक असणाऱ्या ठिकाणी बँकांची शाखा सुरू करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
दहा रुपयाचे नाणे इतर राज्यांमध्ये चालत असताना कर्नाटकमध्ये नाणे स्वीकारण्यास नकार देण्यात येत आहे. नागरिकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यामध्ये बँकांचे पात्र महत्त्वाचे आहे. यासाठी बँक अधिकाऱ्यांनी सरकारच्या योजनांसंदर्भातील पुरावे आणि माहिती सभेमध्ये सादर करणे आवश्यक आहे. नवीन शाखा सुरू करण्यासंदर्भात त्वरित कार्यवाही व्हावी, कोणतेही कारण सांगण्यात येऊ नये, अशी सूचना त्यांनी बँक अधिकाऱ्यांना केली.
यावेळी बँक अधिकाऱ्यांनी स्व-साहाय्य संघांसाठी असणाऱ्या योजनांची व प्रशिक्षणाची माहिती दिली.
यावेळी खासदार मंगला आंगडी, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, लीड बँक व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी, आरबीआय व्यवस्थापक अलोक सिंह, कॅनरा बँक प्रादेशिक अधिकारी के. शिवरामकृष्ण यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.









