आर. व्ही. देशपांडे यांची विद्यार्थ्यांना हाक
बेळगाव : पूर्वीच्या काळी शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही विशेष सुविधा नव्हत्या. कालानुक्रमे बदल झाल्यानंतर शिक्षणाचे महत्त्व सर्वांना समजले. सध्या सरकार मोफत शिक्षण, पाठ्यापुस्तके, गणवेशासह आवश्यक वस्तूंचे वितरण करत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी याचा सदुपयोग करून विद्याविभूषित व्हावे, अशी हाक माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी दिली. बुधवारी विधिमंडळ अधिवेशनातील कामकाज पाहण्यासाठी आलेल्या शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उद्देशून ते बोलत होते. राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रात अनेक बदल आणले आहेत. दैनंदिन अभ्यासाबरोबरच मुलांनी दररोज वृत्तपत्र वाचून देश-विदेशातील घडामोडी, सामान्यज्ञान वाढवावे. गरीब मुलांनी शिक्षणाला अधिक प्राधान्य देऊन सरकारच्या विविध सुविधांचा वापर करून उच्चपदे मिळवावीत. याद्वारे समाजासाठी स्वत:चे असे योगदान द्यावे, असा सल्ला आर. व्ही. देशपांडे यांनी दिला. बदलत्या परिस्थितीत प्रत्येक मुलाने प्रबळ इच्छाशक्ती, एकाग्रता, दृढनिर्धार करून शिकल्यास नियोजित वेळेत आपले लक्ष्य गाठणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी कन्नड आणि सांस्कृतिक खात्याचे उपसंचालक विद्यावती भजंत्री व इतर अधिकारी उपस्थित होते.









