प्रा.डॉ.चंद्रकांत वाघमारे यांचे प्रतिपादन : उचगावात डॉ.आंबेडकर कमानीचे उद्घाटन
वार्ताहर /उचगाव
जगातील दीडशे देशांमधून डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. यावरून त्यांच्या विद्वत्तेची प्रचिती येते. हिमालयासारखे प्रचंड व्यक्तिमत्त्व असलेल्या बाबासाहेबांचे अनुकरण, पैलू आजच्या युवा पिढीने घेतले पाहिजेत. ‘नाचून’ मोठे होण्यापेक्षा ‘वाचून’ मोठे व्हा, असा संदेश कितूर राणी चन्नम्मा विद्यापीठातील प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी उचगाव येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार’ या कमानीच्या उद्घाटनप्रसंगी दिला. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. सदस्य आणि दलित नेते यादो कांबळे होते.
प्रारंभी गावामध्ये डॉ. बाबासाहेबांच्या गाडय़ाची मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार, उपाध्यक्षा मथुरा तेरसे, सदस्य एल. डी. चौगुले, बाळकृष्ण तेरसे, हनुमंत बुवा, भारती जाधव, स्मिता खांडेकर, रूपा गोंधळी, नागरत्ना कोरडे, अनुसया कोलकार, शशिकांत जाधव, अशोक जाधव उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते.
उचगावच्या प्रवेशद्वारामध्ये आंबेडकरनगरच्या प्रवेशद्वारात या कमानीचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले, सिद्धाप्पा कांबळे तसेच पीडीओ वासुदेव व प्रकाश कुडची व प्रा. चंद्रकांत वाघमारे आदी मान्यवरांच्या हस्ते साडेचार लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या भव्य कमानीचे फीतची गाठ सोडून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेणबत्त्या पेटवून डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य यादो कांबळे यांनी मान्यवरांना पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मान्यवरांनी विचार मांडले. सूत्रसंचालन एन. ओ. चौगुले यांनी, आभार अप्पाजी कांबळे यांनी मानले.









