आरोग्य-कुटुंब कल्याण विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : आरोग्य व कुटुंब कल्याण खात्यामध्ये गेल्या 20 वर्षापासून आम्ही कंत्राटी पद्धतीने काम करत आहे. आम्हाला नोकरीत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी बेंगळूर येथील फ्रिडम पार्कवर 13 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. तेव्हा त्याची दखल घ्या, अन्यथा आम्ही हे आंदोलन पुढे सुरूच ठेवू, असा इशारा जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. कोरोनाकाळात तसेच त्यापूर्वी आरोग्य विभागामध्ये आम्ही काम केले आहे. राज्यात 30 हजारहून अधिक आम्ही कर्मचारी कंत्राटी पद्धतीनेच आजपर्यंत आम्ही काम करत आलो आहोत. मात्र आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आम्हाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा तातडीने आम्हाला नोकरीत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे. बेंगळूर येथे अहोरात्र धरणे आंदोलन सुरू आहे. ते आंदोलन आम्ही यापुढेही सुरूच ठेवणार आहे. जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतले जात नाही तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. याचबरोबर आरोग्य अधिकाऱ्यांनाही हे निवेदन देण्यात आले. शंकरगौडा देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन दिले आहे.









