इस्रायलच्या ऐरो-3 ची करणार खरेदी : अंतराळातही लक्ष्य भेदण्याची क्षमता
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायल जर्मनीला ऐरो-3 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा पुरविणार आहे. या यंत्रणेच्या खरेदीसाठी 29 हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे. ऐरो-3 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा 2025 पासून जर्मनीला मिळण्यास सुरुवात होणार आहे. ऐरो-3 क्षेपणास्त्र यंत्रणा एका वेगळ्या होणाऱ्या वॉरहेडच्या मदतीने पृथ्वीच्या वातावरणाबाहेर म्हणजेच अंतराळातही बॅलेस्टिक क्षेपणास्त्र रोखण्याची क्षमता बाळगून आहे.
जर्मनी अन् इस्रायलमधील या कराराला अमेरिकेनेही मंजुरी दिली आहे. ऐरो-3 प्रकल्पात अमेरिका इस्रायलचा भागीदार आहे. या सुरक्षा यंत्रणेची निर्मिती अमेरिका-इस्रायलच्या मिसाइल डिफेन्स एजेन्सीने केली आहे.
ऐरो-3 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणेसाठी जर्मनी 5 हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम अदा करणार आहे. अमेरिकेची मंजुरी या करारातील पहिला मैलाचा दगड आहे. आता कंपनीचे लक्ष्य लवकरात लवकर क्षेपणास्त्र यंत्रणा पुरविण्याचे असल्याचे इस्रायल मिसाइल डिफेन्स ऑर्गनायझेशनचे प्रमुख मोशे पटेल यांनी म्हटले आहे.
युक्रेनवरील रशियाचे आक्रमण पाहता जर्मनीने ऐरो-3 यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:ची हवाई सुरक्षा अधिक मजबूत करून गरज भासल्यास शत्रूचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, ड्रोन आणि लढाऊ विमानांना इंटरसेप्ट करून नष्ट करण्याची क्षमता मिळविण्याची जर्मनीची इच्छा आहे.
इस्रायलने जानेवारी 2022 मध्ये ऐरो-3 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणेचे यशस्वी परीक्षण केले होते. ही यंत्रणा आण्विक, रासायनिक, जैविक किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे अस्त्र वाहून नेऊ शकणाऱ्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना नष्ट करण्यास सक्षम आहे. याचबरोबर ही यंत्रणा पृथ्वीच्या वातावरणाबाहेरील बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनाही नष्ट करू शकते. याचा मारक पल्ला 2400 किलोमीटर इतका आहे. ऐरो-3 क्षेपणास्त्र यंत्रणेचा उपग्रहविरोधी अस्त्र म्हणूनही वापर केला जाऊ शकतो. अशाप्रकारचे तंत्रज्ञान निवडक देशांकडेच आहे.









