वृत्तसंस्था/ रांची
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या महिलांच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या हॉकी स्पर्धेत मंगळवारी झालेल्या विविध सामन्यात जर्मनी, जपान आणि अमेरिका यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.
मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात जर्मनीने झेक प्रजासत्ताकचा 10-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव करत शेवटच्या चार संघात स्थान मिळविले. या सामन्यात जर्मनीच्या सोनेजा झिमरमनने शानदार हॅट्ट्रीय नोंदविले. तसेच जेटी फ्लेशुल्ज आणि चार्लोटी स्टिफेनहॉर्स्ट यांनी प्रत्येकी 2 गोल नोंदविले. जर्मनीच्या झिमरमनने 42 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. तर त्यानंतर तिने 46 आणि 52 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर 2 गोल नोंदवून हॅट्ट्रीक साजरी केली. स्टिफेनहॉर्स्टने 19 व्या आणि 43 व्या मिनिटाला तर फ्लेशुल्जने 22 आणि 44 व्या मिनिटाला गोल केले. निकी लोरेन्झने 39 व्या, पॉलेनी हेन्जने 54 व्या आणि सिलेन ओरूझने 55 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या सामन्यात शेवटपर्यंत झेक प्रजासत्ताकला आपले खाते उघडता आले नाही. या मोठ्या विजयामुळे जर्मनीने अ गटातून 3 सामन्यातून 7 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले आहे. गुरूवारी आता जर्मनीचा उपांत्य फेरीचा सामना ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाबरोबर होईल.
अ गटातील मंगळवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात जपानने चिलीचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात जपानतर्फे पहिल्याच मिनिटाला केना युरेटाने मैदानी गोल नोंदविला. 23 व्या मिनिटाला जपानचा दुसरा गोल मियु हॅसेगेवाने केला. हॅसेगेवाचा हा गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला गेला. या विजयामुळे जपानने अ गटात तीन सामन्यातून 7 गुणासह दुसरे स्थान मिळविले. या गटात सरस गोल सरासरीच्या जोरावर जर्मनीने जपानला मागे टाकले आहे. जपानचा या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना गुरूवारी ब गटातील पहिल्या स्थानावरील संघाबरोबर होणार आहे. चिली संघाने या सामन्यात पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या.
मंगळवारी या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या ब गटातील सामन्यात अमेरिकेने न्यूझीलंडचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत अमेरिकेने आपले सर्व सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. आता अमेरिकेचा उपांत्य फेरीचा सामना गुरुवारी जपान बरोबर खेळविला जाणार आहे. ब गटातील शेवटच्या सामन्यात अमेरिकेचा एकमेव निर्णायक गोल 17 व्या मिनिटाला एलिझाबेथ इगेरने केला. अमेरिकेला या सामन्यात मिळालेला हा तिसरा पेनल्टी कॉर्नर होता. मध्यंतरापर्यंत अमेरिकेने न्यूझीलंडवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती.









