वृत्तसंस्था/ बर्लिन
जर्मनीत खेळविल्या गेलेल्या जर्मन सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद बायर लिव्हरकुसेन संघाने पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बायर लिव्हरकुसेनने स्टुटगार्टचा पेनल्टीमध्ये 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला.
हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झाला. पॅट्रीक स्किहेकने निर्धारित वेळेतील 88 व्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलामुळे लिव्हरकुसेनने स्टुटगार्टला 2-2 असे बरोबरीत रोखले. त्यानंतर पंचांनी ज्यादा कालावधीचा अवलंब केला. गोलकोंडी कायम राहिल्याने अखेर पेनल्टीचा वापर करण्यात आला आणि बायर लिव्हरकुसेनने स्टुटगार्टवर 4-3 अशी मात करुन जेतेपद पटकाविले.
या सामन्यात व्हिक्टर बोनीफेसने पूर्वार्धात शानदार गोल नोंदवून लिव्हरकुसेनला आघाडी मिळवून दिली. पण मिलॉटने स्टुटगार्टला बरोबरी साधून देताना हेडरद्वारे गोल केला. त्यानंतर 63 व्या मिनिटाला डेनिझ युनडेव्हने गोल नोंदवून स्टुटगार्टला 2-1 असे आघाडीवर नेले. शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांकडून आक्रमक आणि वेगवान खेळ झाला. 88 व्या मिनिटाला स्किहेकने लिव्हरकुसेनला बरोबरी साधून दिली. शूटआऊटमध्ये लिव्हरकुसेनच्या गोलरक्षकाने स्टुटगार्टच्या क्रेझीगने स्पॉटकिकवरुन मारलेला फटका अडविल्याने लिव्हरकुसेनने हा सामना 4-3 अशा फरकाने जिंकून सुपर चषकावर आपले नाव कोरले.
जर्मनीत सुरु असलेल्या जर्मन चषक फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात बोरुसिया डॉर्टमंडने फोनिक्स लुबेकचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव करत विजयी सलामी दिली. दुसऱ्या एका सामन्यात बार्यन म्युनिचने दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविताना युलेमचा 4-0 असा फडशा पाडला.









