वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या जर्मन खुल्या सुपर-300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेनच्या कामगिरीवर भारताची भिस्त राहील. मात्र, किदाम्बी श्रीकांतने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
यापूर्वी झालेल्या जर्मन खुल्या सुपर-300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा माजी टॉप सीडेड किदाम्बी श्रीकांतने उपविजेतेपद मिळविले होते. मात्र, यावेळी त्याने या स्पर्धेतून माघार घेण्याचे ठरविले आहे. पुरुष एकेरीत भारताची भिस्त प्रामुख्याने लक्ष्य सेनवर राहील. त्याचप्रमाणे नव्याने राष्ट्रीय विजेतेपद मिळविणारा मिथुन मंजुनाथ याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. लक्ष्य सेनने यापूर्वी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. तसेच त्याने गेल्या खेपेला झालेल्या जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत डेन्मार्कच्या टॉप सीडेड व्हिक्टर ऍक्सलसनकडून त्याला हार पत्करावी लागली होती. 21 वषीय लक्ष्य सेनचा या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामना फ्रान्सच्या पोपोव्हशी होणार आहे. हा सामना जिंकला तर सेनची उपांत्यपूर्व फेरीत गाठ मलेशियाच्या जियाशी पडेल. महिला एकेरीमध्ये मालविका बनसोड आणि सायना नेहवाल त्याचप्रमाणे मिश्र दुहेरीत अश्विनी पोनाप्पा व बी. सुमित रेड्डी भारताचे प्रतिनिधित्व करतील.









