वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
एफ-1 आंतरराष्ट्रीय मोटर रेसिंग क्षेत्रातील जर्मनीचा जागतिक दर्जाचा चालक तसेच आतापर्यंत चारवेळा एफ-1 चॅम्पियनशिप मिळविणारा सेबॅस्टियन व्हेटेलने 2022 च्या एफ-1 रेसिंग हंगामानंतर निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले.
सेबॅस्टियन व्हेटेलने 2010 ते 2013 या कालावधीत चारवेळा एफ-1 चॅम्पियनशिप पटकाविताना रेड बुल संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. 2019 साली त्याने फेरारीसमवेत आपली शेवटची शर्यत जिंकली होती. 2022 च्या रेसिंग हंगामात व्हेटेल ऍस्टन मार्टिनसमवेत विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. पण मार्टिनसमवेत त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. तो सध्या सहाव्या स्थानावर आहे. या रेसिंग हंगामाअखेर आपण आंतरराष्ट्रीय एफ 1 रेसिंग क्षेत्रातून निवृत्त होणार असून यापुढे मी माझा अधिक वेळ कुटुंबीयासमवेत घालविणार असल्याचे व्हेटेलने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. व्हेटेलने आपल्या वैयक्तिक कारकीर्दीत 53 शर्यती जिंकल्या आहेत. एफ-1 रेसिंग क्षेत्रामध्ये सर्वाधिक शर्यती जिंकणाऱया चालकांमध्ये व्हेटेल तिसऱया स्थानावर आहे. ब्रिटनचा लेविस हॅमिल्टन 103 शर्यती जिंकत पहिल्या स्थानावर असून जर्मनीचा माजी टॉप सिडेड रेसर मायकेल शुमाकर 91 शर्यती जिंकत दुसऱया स्थानावर आहे. 2010 साली व्हेटेलने पहिल्यांदा विश्व चॅम्पियनशिप पटकाविली. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वात कमी वयाचा चालक म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या वयाच्या 23 व्या वर्षी हा पराक्रम केला होता.









