इटलीतील अत्यंत जहाल विचारसरणीच्या नेत्या
वृत्तसंस्था/ रोम
इटलीत पंतप्रधानपदाच्या प्रबळ उमेदवार म्हणुन जियोर्जिया मेलोनी यांचे नाव समोर आले आहे. मारिया द्रागी यांनी राजीनामा दिल्यावर नवा पंतप्रधान निवडला जाणार आहे. जियोर्जिया यांची जहाल विचारसरणीच्या नेत्या म्हणून ओळख आहे. इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळू शकतो.
25 सप्टेंबर रोजी इटलीत निवडणूक होणार आहे. जियोर्जिया मेलोनी या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या राजकीय पक्षाच्या मागील आठ वर्षांपासून नेत्या आहेत. 1922 मध्ये बेनिटो मुसोलिनी यांच्यानंतर पहिल्या सर्वात जहाल विचारसरणीच्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वीपासून मेलोनी या वादग्रस्त ठरल्या आहेत. 1996 मध्ये त्यांनी एका मुलाखतीत फॅसिस्ट नेता मुसोलिनीला मागील 50 वर्षांमध्ये सर्वात चांगला राजकीय नेता संबोधिले हेते.
इटलीच्या आगामी निवडणुकीत त्या राष्ट्रवाद अन् ख्रिश्चन धर्माच्या मुद्दय़ासह मैदानात उतरणार आहेत. मेलोनी या 2006 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी इटलीतील कनिष्ठ सभागृह ‘चेंबर ऑफ डेप्युटीज’च्या सर्वात कमी वयाच्या उपाध्यक्ष झाल्या होत्या. दोन वर्षांनी त्या कॅबिनेटमंत्री झाल्या. 2012 मध्ये त्यांनी ब्रदर्स ऑफ इटली नावाचा पक्ष स्थापन केला होता. 2014 पासून त्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत.









