वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विरोधी पक्षांनी गाजावाजा केलेल्या फोन हॅकिंग प्रकरणाचा सूत्रधार राहुल गांधीचे मित्र मानले जाणारे उद्योगपती जॉर्ज सोरोस हेच आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. सरकारकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर मोबाईल हेरगिरी केली जात आहे, असा संदेश अनेक विरोधी पक्षनेत्यांच्या आयफोनवर आल्यानंतर या नेत्यांनी केंद्र सरकारवर मंगळवारी अनेक आरोप केले होते. बुधवारी भाजपच्या प्रवक्त्यांनी पलटवार केला असून सोरोस यांच्याकडे बोट दाखविले आहे.
जॉर्ज सोरोस हे राहुल गांधी यांचे मित्र मानले जातात. त्यांनी अर्थसाहाय्य केलेली ‘अॅक्सेस नाऊ’ ही कंपनी या संदेशाच्या मागे आहे, असे भाजपकडून दाखवून देण्यात आले आहे. हा संदेश आपल्याकडून पाठविण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण आयफोनची निर्माती असणाऱ्या अॅपल कंपनीने मंगळवारीच केले होते. त्यामुळे हा संदेश कोणी पाठविला, याचा शोध घेण्याचे काम सुरु करण्यात आले. भाजपच्या आयटी कक्षाने या संदेशाचा संबंध सोरोस यांच्याशीच असल्याचे स्पष्ट झाल्याचे प्रतिपादन केले आहे. अॅक्सेस नाऊ या कंपनीच्या माध्यमातून हा संदेश भारतातील विरोधी पक्षनेत्यांना पाठविण्यात आल्याचा आरोप आहे.
वातावरण बिघडविण्यासाठी…
भारतात एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधी सत्ताधारी पक्षाविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून केला जात आहे. मंगळवारचा फोन हॅकिंगचा आरोप हा याच प्रयत्नाचा भाग आहे. बेकायदेशीर मार्गाने केंद सरकार विरोधी पक्षांचे मोबाईल हॅक करुन हेरगिरी करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी जाणून बुजून केला आहे. अशी कोणतीही हेरगिरी केंद्र सरकारने केलेली नाही. अॅपल कंपनीनेही आता स्पष्टीकरण केल्याने विरोधी पक्षांचे पितळ उघडे पडले आहे, असा प्रत्यारोप भाजपच्या नेत्यांनी केला असून विरोधकांचेच हसे झाल्याची टिप्पणी केली आहे.









