वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
अमेरिकन गुंतवणुकदार जॉर्ज सोरोस यांचा मुद्दा केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेतही वादग्रस्त आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याकडुन सोरोस यांना सन्मानित करण्यात आल्यावर एलन मस्क यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तर आता मस्क यांनी सोरोस यांना मानवतेचा शत्रू ठरविले आहे. सोरोस यांनी एक वृत्त अहवाल सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानुसार संयुक्त राष्ट्रसंघातील इस्रायलच्या प्रतिनिधीने जॉर्ज सोरोस यांच्यावर हमास समर्थक एनजीओला निधी पुरविल्याचा आरोप केला आहे. जॉर्ज सोरोस यांच्या मानवतेबद्दलच्या द्वेषात इस्रायलद्वेषही सामील असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी 19 नावांची घोषणा केली होती. यात जॉर्ज सोरोस यांचेही नाव सामील होते. सोरोस यांना प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम प्रदान करण्याचा प्रकार हास्यास्पद असल्याचे मस्क यांनी म्हटले होते. जॉर्ज सोरोस हे अमेरिकन अब्जाधीश असून त्यांनी 1992 मध्ये शॉर्ट सेलिंगद्वारे बँक ऑफ इंग्लंडला प्रचंड नुकसान पोहोचविले होते. जॉर्ज सोरोस हंगेरीत एका ज्यू परिवारात जन्मले होते. 1979 मध्ये सोरोस यांनी ओपन सोसायटी फौंडेशनची स्थापना केली होती. या संघटनेला कथित स्वरुपात लोकशाही आणि मानवाधिकारांची कामे करण्यासाठी स्थापन करण्यात आले होते. परंतु सोरोस आणि त्यांची संघटना अनेक देशांमधील उजव्या विचारसरणीच्या पक्षांना टार्गेट करत असल्याचा आरोप आहे. सोरोस हे भारतातील राजकारणात हस्तक्षेप करू पाहत असल्याचाही आरोप आहे.









