काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल कवठणकर यांचा आरोप : जीएसटीच्या नावाखाली लोकांची फसवणूक
पणजी : जेनिटो कार्दोझला अटक हे फक्त एक ‘नाटक’ असल्याची टीका काँग्रेस पक्षाने केली असून रामा काणकोणकर मारहाण प्रकरण थंड करण्यासाठी भाजपने जीएसटी उत्सव सुरु केल्याचे पक्षाने म्हटले आहे. जीएसटीच्या नावाखाली गेल्या अनेक वर्षांत भाजपने करोडो रुपयांची लूट केली आहे. आता त्यात दरकपात करुन लोकांना फसवण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनिल कवठणकर यांनी केला आहे. पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जेनिटो आणि इतरांना अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष असे परिश्रम घेतले नाहीत. ते अटकेसाठी तयारच होते. जेनिटोला तर पोलिस संरक्षणात पणजी पोलिसस्थानकात नेण्यात आले, त्यावरुन सत्ताधारी भाजपची चाल स्पष्ट होते, असेही ते म्हणाले. भाजप महिला मोर्चाने स्वत:ची पाठ थोपटून घेतली पण तीन मोफत सिलिंडरच्या प्रश्नावर त्यांची दातखिळी बसली. रामाच्या पत्नीला खरे तर त्या भाजप महिला मोर्चाने भेटून धीर देण्याची गरज होती परंतु तसे काही त्यांनी केले नाही. हल्ल्याचा साधा निषेध करणेही त्यांना जमले नाही, असे कवठणकर म्हणाले. भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष विरोधी पक्षीय आमदारास धमकी देतात हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे सांगून कवठणकर आणि मनिषा उसगांवकर तसेच रिनाल्डो रोझारियो या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजप व सरकारवर हल्लाबोल केला. जनतेने भाजपची लबाडी ओळखावी, असे आवाहन त्यांनी केले.









