प्रतिनिधी/ पणजी
सामाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणातील मुख्य संशयित जेनिटो कार्दोझ याला दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्याला रविवारी संध्याकाळी पणजी पोलिसांनी अटक केली होती.
काणकोणकर हल्ला प्रकरणात आतापर्यंत 8 संशयितांना अटक करण्यात आली असून सर्वजण पोलिस कोठडीत आहेत. मात्र या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण आणि त्याच्यावर कारवाई कधी होईल याची उत्सुकता गोमंतकीयांना लागून राहिली आहे. मास्टरमाइं&ड हा एक मंत्री असल्याचा आरोप खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केला होता. शुक्रवारी विरोधकांनी हल्ला प्रकरणाच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनात त्यांनी हा आरोप केला होता.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक, पणजी उपविभागीय अधिकारी सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पणजी पोलिसस्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. हल्ला प्रकरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असलेल्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून उलटतपासणी केली जात आहे. काही जणांना प्रतिबंधात्मक अटक केली जात आहे. आतापर्यंत मुख्य संशयित सोडून 14 जणांची उलटतपासणी केली असून त्यातील 12 जणांना प्रतिबंधात्मक अटक केली आहे. पणजी उपविभागीय अधिकारी ताब्यात असलेली ओल्ड गोवा, आगशी आणि पणजी पोलिसस्थानक या तिन्ही पोलिसस्थानकाचे पोलिस या प्रकरणाच्या तपासकामात गुंतलेले आहेत.









