नोकरदार तसेच कामगार वर्गाची गैरसोय
बेळगाव : हेस्कॉमकडून रविवारी शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. वीजपुरवठा बंद राहू नये यासाठी दुकानदारांनी अगोदरच जनरेटरची व्यवस्था करून ठेवली होती. यामुळे रविवारी बऱ्याच ठिकाणी जनरेटरची घरघर ऐकू आली. साप्ताहिक सुटी असतानाही वीज नसल्याने नोकरदार तसेच कामगार वर्गाची गैरसोय झाली. कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काँग्रेस अधिवेशनाचा शतकमहोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडणार असल्याने हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. बेळगाव शहरासह जवळपासच्या खेड्यांमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ट्रान्स्फॉर्मर, वीजवाहिन्या, कलंडलेले विद्युत खांब यांची दुरुस्ती करण्यात येत आहे.अधिवेशन काळात विजेअभावी यासाठी दुरुस्ती केली जात आहे. यामुळे हेस्कॉमकडून पूर्वसूचना देण्यात आली होती. त्यानुसार शहराच्या काही भागात व शहरालगतच्या काही गावांमध्ये वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यापुढेही टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा बंद केला जाणार आहे.
हेस्कॉमचा अंदाधुंदी कारभार
पूर्वसूचना दिल्याने नागरिकांनी जनरेटर तसेच इनव्हर्टर भाड्याने आणून ठेवला. तर काहींनी कामगारांना सुट्या दिल्या. परंतु पूर्वसूचना देऊनही वीज न गेल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हेस्कॉमने ज्या भागात वीज काढली जाईल. त्याच भागाची पूर्वसूचना देण्याची मागणी व्यापाऱ्यांमधून होत आहे.









