दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी छत्तीसगडच्या कवर्धामध्ये रोड शो केला आहे. यादरम्यान केजरीवालांनी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे. दिल्लीत आम्ही अत्यंत चांगले काम केल्याने तेथील लोकांना तीनवेळा आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. दिल्लीत आम्ही सर्वांना मोफत वीज पुरवत आहोत. छत्तीसगडमध्ये देखी मोफत वीज हवी असल्यास आम आदमी पक्षाला मतदान करा असे केजरीवालांनी जनतेला उद्देशून आवाहन केले आहे.
दिल्लीत जनरेटर आणि इन्व्हर्टरची दुकाने बंद झाली असून 24 तास वीज उपलब्ध होत आहे. छत्तीसगडप्रमाणेच दिल्ली आणि पंजाबच्या शासकीय शाळांची स्थिती पूर्वी वाईट होती, परंतु आता श्रीमंत लोक देखील खासगी शाळांमधून काढून स्वत:च्या मुलांना शासकीय शाळांमध्ये शिकवत आहेत. जर भ्रष्ट अन् गलिच्छ राजकारण हवे असल्यास भाजप अन् काँग्रेसला मतदान करा. स्वच्छ अन् प्रामाणिक सरकार इच्छित असल्यास आम आदमी पक्षाला समर्थन द्या असे केजरीवालांनी उपस्थित जनसमुदायाला उद्देशून म्हटले आहे.
छत्तीसगडमध्ये आप सरकार आल्यास सर्व पिकांची खरेदी हमीभावाद्वारे करण्यात येणार आहे. आम्ही येथे व्यवसाय करण्यासाठी आलेलो नाही. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली असून आजवर काँग्रेस आणि भाजपने चांगल्या शाळा निर्माण करू असे म्हटलेले नाही. चांगल्या शाळा निर्माण झाल्या असत्या तर मुलांना चांगले शिक्षण मिळाले असते आणि देश गरीब राहिला नसता असा दावा केजरीवालांनी केला आहे.
आम्ही पंजाब आणि दिल्लीत क्रांती पाहिली असून आम्ही त्याचे साक्षीदार देखील आहोत. छत्तीसगडच्या निर्मितीला 23 वर्षे झाली, परंतु अद्याप काहीच बदलले नाही. गरीब स्वत:च्या मुलांव अन् वृद्धांवर उपचार करवू शकत नाही. भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका. भाजपचे 15 लाख रुपयांचे आश्वासन खोटे निघाले. आता तर चहा तयार करता येतो का यावरही संशय निर्माण झाल्याचे म्हणत भगवंत मान यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.









