आपला मुलगा किंवा मुलगी नंदन निलकेणी, सुंदर पिचाई, स्टीव्ह जॉब्स, किरण शॉ-मुजुमदार, इंद्रा नुयी, मनोज वाजपेयी, नवाजुद्दिन सिद्दिकी, कल्पना चावला असावा/असावी असे अनेक पालकांचे स्वप्न असते. परंतु तो/ती अशा चार-पाच टक्क्याप्रमाणे अपवादात्मक यश मिळवणारी जिद्दी नाही, सर्वसामान्य आहेत हे सत्य स्विकारण्यास अनेक पालक फार उशीर करतात. अलीकडे दहावीच्या परीक्षेत ऐंशी-नव्वद टक्के मार्क कोणालाही मिळतात. वाढलेल्या अपेक्षांचा फुगा अकरावीला फुटतो आणि ते मार्क साठ ते सत्तर टक्क्यापेक्षा खाली येतात. त्यानंतर बारावीला पन्नास ते साठ टक्के मिळवणारी अनेक मुले-मुली आपल्या आजूबाजूला दिसतात. खरे तर हीच वेळ सजगपणे आपल्या पाल्याची कुवत ओळखण्याची आहे. परीक्षेत मार्क कमी पडले आहेत. त्यामुळे आता आणखी एक वेगळा क्लास लावणे हा पर्याय नसून नव्याने करियरचे रस्ते शोधणे हा आहे. हीच ती वेळ, हाच तो क्षण, जिथे आई-वडिलांनी आपल्या पाल्याबरोबर खेळीमेळीच्या वातावरणात सविस्तर चर्चा करावी. अकरावी-बारावीला चुकीच्या विषयांची निवड केली आहे का?, अभ्यासाची आवड नसल्यास आपल्या पाल्याकडे असा कोणता गुण आहे, ज्याचे वाचन तो/ती पुढील चार वर्षे कोणाच्याही पाठ-पुराव्याशिवाय करू शकतो/शकते?, पाल्याकडे कोणते कौशल्य आहे ज्याकडे गेल्या दोन-तीन वर्षात दुर्लक्ष झाले आहे? अशा अनेक प्रश्नांची यादी करून सांगोपांग चर्चा कुटुंबामध्ये सर्वांसमक्ष झाली तर उत्तम.
शालेय-महाविद्यालयीन अभ्यासात गती नसल्यास त्याला/तिला कशाची आवड आहे याचा विचार करावा. “अभ्यासात गती नसेल तर याला नाटकात/सिनेमात काम करायला पाठवायचे का?” असे विचित्र प्रश्न पालकांकडून विचारले जातात. नाटक-चित्रपट-संगीत अशा क्षेत्रात करियर करायचे असल्यास त्या कलेचा रियाज करण्यासाठी रोज किमान सहा तास देण्याची तयारी असावी. मनोज वाजपेयी, नवाजुद्दिन सिद्दिकी, पंकज त्रिपाठी अशी मोजकी उदाहरणे आपल्या नजरेसमोर आहेत ज्यांनी जिद्दीने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर केले. परंतु त्यांनी किती वर्षे स्ट्रगल केला याचा विचार करावा. ज्यांचा स्ट्रगल यशस्वी ठरला नाही, अशी उर्वरित 95 टक्के उदाहरणे आपल्याला माहित नसतात. आपल्या पाल्यासाठी आपण हौसेने गिटार विकत घेऊन दिल्यास त्याचा/तिचा रियाज रोज किती वेळ केला जातो, याकडे लक्ष देता येईल. क्लासला नाव नोंदवल्यामुळे प्रश्न सुटत नाही. क्लासमधून घरी आल्यानंतर वैविध्यपूर्ण संगीत ऐकणे आणि क्लासमध्ये शिकवले आहे. त्यापलीकडे जाऊन स्वत: काही शोधणे यासाठी लागणारा उत्साह आणि चिकाटी असण्याची गरज पालकांनी आपल्या मुला-मुलींना जरूर सांगावी. संगीत क्षेत्रात यशस्वी करियर करण्यापूर्वी रियाज करण्याबरोबर काम मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. शंकर एहसान लॉय यांचा ‘दिल चाहता है’ चित्रपट यशस्वी होण्यापूर्वी किती वर्षे ते अनेक स्टुडियोचे दार ठोठावत होते, याची माहिती घ्यावी. नवाजुद्दिन सिद्दिकीला ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ मिळण्यापूर्वी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘सरफरोश’ सारख्या चित्रपटात एक-दोन मिनिटांची कामे स्वीकारावी लागली होती. एकूणच आपल्या पाल्याची आवड कोणत्या क्षेत्रात आहे आणि त्या क्षेत्रात करियर करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्यासाठी पालक या नात्याने आपण किती वेळ देणार आहोत आणि त्या वास्तवाचे भान सुटू देऊ नये यासाठी बालक आणि पालक कसे प्रयत्न करणार आहोत, यावर विचार व्हावा.
आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे अनेक युवक स्वत:ला फोटोग्राफर समजतात. तात्पुरता पैसा दाखवणाऱ्या ‘प्री-वेडिंग शूट’ सारख्या अनेक संधी उपलब्ध असल्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसा मिळवणारे क्षेत्र म्हणून युवक या क्षेत्राकडे वळू शकतात पण काही फोटो उत्तम काढल्यामुळे लगेच फोटोग्राफीचा कोर्स करून त्यामध्ये खोऱ्याने पैसा ओढणारे करियर करता येत नाही. या क्षेत्रामध्ये करियर करण्यासाठी आपल्या पाल्यास लाख रुपये किमतीचा कॅमेरा घेण्यापूर्वी पाचशेच्या आसपास किंमत असणारी चार-पाच पुस्तके घेऊन द्यावीत आणि ती पुस्तके ठरावीक मुदतीत वाचून झाल्यास अनुभवी फोटोग्राफरकडे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवावे. फोटोग्राफीसारख्या क्षेत्रात कॅमेरा आणि विविध लेन्स यांचे एकूण बजेट पाच ते दहा लाखाच्या आसपास जाते. एकाचवेळी सर्व उपलब्ध करून दिल्यास ती गुंतवणूक वाया जाणार हे नक्की. त्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत एकेक कामे मिळवून त्यामधून मिळणाऱ्या पैशामधून युवकांनी लेन्स खरेदी कराव्यात. फोटोग्राफी शिकण्यासाठी कॅमेरा असावा परंतु वाइल्ड फोटोग्राफी करण्यासाठी निसर्गामधील वैविध्याचा अभ्यास, इंडस्ट्रीयल फोटोग्राफीसाठी जाहिरात क्षेत्राचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. प्रत्येक चित्र-चित्रपटाकडे कॅमेरा अँगलने बघण्याची दृष्टी येण्यासाठी कुशल फोटोग्राफरचा सहाय्यक या नात्याने मिळेल ते काम करणे, रंगसंगती प्रकाशयोजना यांच्या अभ्यासाला अफाट जनसंपर्क व बोलण्याच्या कलेची जोड देणे असे अनेक गुण अंगीकारावे लागतात.
“काहीच जमत नसेल तर बिझनेस करून बघ” असा पर्याय काही पालक सुचवतात. बिझनेस करण्याकडे आपल्या पाल्याचा कल आहे का, याची खातरजमा करण्यासाठी महाविद्यालयाच्या सुट्टीच्या काळात अनेक उद्योग करून बघता येतात. त्यासाठी मिळेल तेवढे भांडवल पालकांनी पुरवू नये. दहा हजार रुपयांचे महिन्याभरात बारा हजार करून देण्याचे आव्हान आपल्या पाल्याने पेलल्यास पुढची पावले उचलता येतात. गुजरात-राजस्थानमधून आलेले व्यापारी आपल्या घरातील युवा पिढीला आपल्याच ‘सुपर मार्केट’सारख्या दुकानात पडेल ती कामे करण्यासाठी किमान चार ते पाच वर्षे रोज आठ ते दहा तास काम करावयास लावतात. सकाळी सहा वाजता दुकान उघडण्यास पाठवणे, घाऊक पद्धतीने दुकानात लागणारे सामान आणणे, दुकानात लावणे, घरपोच किराणा पाठवण्याची कामे करावयास लावणे, अशी अनेक कामे केल्यानंतर त्यांना दुकानाच्या गल्ल्यावर बसवले जाते. ही मुले ‘एमबीए’ सारखे शिक्षण न घेता अशा अनुभवातून गेल्यानंतर त्यांना बँकेतून कर्ज काढून देऊन त्यांचे स्वत:चे दुकान उघडून दिले जाते. ते कर्ज फेडण्याची जबाबदारी त्या युवकाची असते. अशा पद्धतीच्या अनुभवातून आपल्या घरातील पुढच्या पिढीला आपण वाढवतो का, याचा विचार सर्वच पालकांनी करावा.
अंग-मेहनतीची कामे आपल्या पाल्यास करावी लागू नयेत यासाठी आटापिटा करणाऱ्या पालकांची संख्या वाढत आहे. अभ्यासात गती नसल्यास प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, टेलरींग,
लॅब असिस्टंट, ड्रायव्हर, इंटिरियर डिझायनर, मोटर
मेकॅनिक, मशीन दुरुस्ती असे कौशल्य असणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सुरुवातीला सर्व बारकावे समजून घेण्यासाठी सर्व कामे केल्यानंतर कामगार नेमणे आणि त्यांच्याकडून काम करवून घेतल्यास दरमहा किमान 50,000 सहज मिळू शकतात. परंतु त्यासाठी पहिली पाच वर्षे पडेल ते काम करण्याची तयारी युवकांची असावी. आज हे काम करणारी मराठी माणसे मिळत नाहीत त्यामुळे अन्य राज्यातून येणाऱ्या युवकांना या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी मिळत आहेत. परराज्यातून आलेली हे युवक सुरुवातीला दरमहा 10,000 ते 20,000 कमावतात पण एक-दोन खोल्यांच्या जागेत राहून दरमहा 5,000 घरी पाठवतात. कोकणात शेतावर काम करणारे मजूरही परराज्यातून आलेले असतात कारण मराठी मुले ही बारीक-सारीक कामे मिळवून त्यातून अनुभवाचे शिक्षण घेण्यास तयार नसतात. ‘तसली कामे तू करू नकोस’ असे उपदेश घरात मिळाल्यावर कोणताही युवक अशी कामे करणार नाही. मातीत हात घातल्याशिवाय शेती करता येत नाही. जसजसा उद्योग वृद्धिंगत होत जातो तसतसे मातीत हात घालण्याचे काम मालकास करावे लागत नाही.
आयटीआय ही पूर्वी एक नावाजलेली संस्था होती परंतु आता तिथे प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, ब्युटीशियन असे कोर्स उपलब्ध असले तरी त्या कोर्सचा बाहेरच्या जगाशी काही संबंध नाही. त्या कोर्सचा अभ्यासक्रम कालानुसार बदललेला नाही तसेच कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या इंडस्ट्रीतले नवीन ट्रेंड कळण्याची कोणतीही व्यवस्था आज अस्तित्वात नाही. पुण्यातील आयटीआय संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देता येईल असे सुचवल्यावर तेथील शिक्षक-चालक वर्ग त्यासाठी प्रचंड नाखूष दिसला.
सुहास किर्लोस्कर








