पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील जनरल मोटर्स कंपनी बंद करण्यात आली असून, त्या ठिकाणी नवी कंपनी सुरू होणार आहे. या नवीन कंपनीने पूर्वीच्याच कामगारांना कामावर घ्यावे, या मागणीसाठी कामगार ३१ जुलै रोजी तळेगाव ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा काढणार असल्याची माहिती जनरल मोटर्स कामगार संघटना संलग्न श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारुती जगदाळे यांनी दिली.
तोट्याचे कारण देत कंपनी बंद करण्यात आली आहे. जनरल मोटर्स कंपनी बंद करण्यास सरकारने पाच जुलै रोजी परवानगी दिली. तेथे आता दुसरी कंपनी होणार आहे. सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे औद्योगिक क्षेत्रात अचानक कंपन्या बंद करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे हजारो कामगार रस्त्यावर येत आहेत. कंपनीवर अवलंबून असणारे असंख्य लघुउद्योग, वर्कशॉप व माल वाहतूक आदी व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.
जनरल मोटर्स कंपनी दुसऱ्या कंपनीला हस्तांतरण करण्यात येणार आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या कंपनीने पूर्वीच्याच कामगारांना वेतनवाढ करारानुसार कामावर घ्यावे. तसे न केल्यास हजारो कामगार व त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येतील. सरकारच्या कामगार धोरणांमुळे असे अचानक कंपनी बंद करण्याचे प्रकार होत आहेत. या धोरणांच्या निषेधार्थ, पूर्वीच्याच कामगारांना कामावर घ्यावे यासाठी तळेगाव ते मुंबई मंत्रालय असा कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचा पायी धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.








