दरड कोसळणाऱ्या ठिकाणी लक्ष देण्याची सूचना
बेळगाव : पावसाळ्यात लोंढा-वास्को रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळण्यासह रेल्वे रूळावरून घसरण्याच्या घटना घडत असतात. यासाठी बुधवारी नैर्त्रुत्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांच्या उपस्थितीत या मार्गाची पाहणी करण्यात आली. करंझोळ, दूधसागर परिसरात रेल्वेरूळाची तपासणी करण्यात आली. नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक मुकुल सरन माथूर यांनी रेल्वेमार्गाची सुरक्षेसंदर्भात पाहणी केली. हुबळी व अळणावर परिसरातील धोकादायक रेल्वेमार्गाची त्यांनी माहिती घेतली. रेल्वेब्रिज, तसेच ट्रॅक वेळच्यावेळी दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. करंझोळ रेल्वेस्थानकावर रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टॅन्डर्ड ऑर्गनायझेशन संघासोबत चर्चा केली. मागील दोन वर्षांत या मार्गावर अनेकवेळा रेल्वे रूळावरून घसरल्या आहेत. त्याचबरोबर रेल्वेमार्गावर दरड कोसळली आहे. आठ दिवसांपूर्वी वास्को-बेंगळूर रेल्वे रूळावरून घसरल्याची घटना घडली होती. त्याची माहिती अधिकाऱ्यांनी घेतली. रेल्वेरूळावरील काँक्रीटचे स्लिपर, तसेच इतर साहित्याची वेळीच तपासणी करण्याची सूचना त्यांनी दिली. यावेळी डीआरएसओचे संचालक बी. पी. सिंग, हुबळी विभागाच्या व्यवस्थापक बेला मीना यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.









