अध्याय पहिला
युद्धाला सुरवात होण्यापूर्वी दुर्योधनाने द्रोणाचार्यांना दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा परिचय करून दिला. पुढे त्याने सांगितले की, सेनापती भीष्मांनी सर्व बाजूंनी रक्षण केलेले आमचे सैन्य अजिंक्य आहे, पण भीमाने रक्षण केलेले त्यांचे सैन्य क्षुद्र असल्याने जिंकण्यास सोपे आहे. येथे दुर्योधनाचा फाजील आत्मविश्वास दिसून येतो. अफाट अमुचे सैन्य भीष्माने रक्षिले असे । मोजके पांडवांचे ते भीमाने रक्षिले असे ।।10।। ह्या अर्थाचा हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ व जगात नावाजलेले योद्धे असलेले भीष्माचार्य, हे कौरवांचे सेनापती आहेत. त्यांनी आपल्या युध्द कौशल्याच्या बळावर सैन्याची अशी काही रचना केली आहे की, जणू ते अभेद्य किल्लेच आहेत.
पुढे दुर्योधन म्हणाला, अशा ह्या बलिष्ट सैन्याबरोबर कोण झगडेल? त्या मानाने पांडवांचे सैन्य खरोखरच अपुरे दिसत आहे आणि त्यात आडदांड भीमसेन त्यांच्या सैन्याचा अधिपती झाला आहे, त्यामुळे परिणाम काय होणार हे स्पष्टच दिसतो आहे. असे बोलून त्याने ती गोष्ट तेव्हढ्यावरच सोडून दिली.
पुढील श्लोकात त्याने सर्वांना सूचना दिली की, व्यूहरचनेप्रमाणे नेमलेल्या ठिकाणी उभे राहून सर्वांनी मिळून भीष्मांचे सर्व बाजूंनी रक्षण करा.
राहुनी आपुल्या स्थानी जेथे ज्यास नियोजिले । चहूकडून रक्षाल भीष्मास सगळे जण ।।11।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, मग दुर्योधन सर्व सेनापतींना असे म्हणाला की आपापले सैन्यसमुदाय सज्ज करा. ज्यांच्या ज्या अक्षौहिणी आल्या असतील त्यांनी त्या अक्षौहिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्याकडे द्यायच्या आहेत त्या द्या. त्या महारथ्याने त्या अक्षौहिणीना आपल्या हुकमतीत ठेवावे आणि सर्वजण भीष्मांच्या आज्ञेत रहा त्यांचे रक्षण करा. नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांवर देखरेख ठेवावी.
येथपर्यंतचा वृत्तांत धृतराष्ट्राला सांगून झाल्यावर संजय पुढील श्लोकात म्हणाला, दुर्योधनाच्या बोलण्याने संतुष्ट होऊन, त्याला आनंद व्हावा म्हणून कुरुकुलातील वृद्ध पितामह प्रतापी भीष्माचार्यानी सिंहनादाप्रमाणे मोठी गर्जना करून शंख वाजवला.
हर्षवीत चि तो त्यास सिंह-नाद करूनिया । प्रतापी वृद्ध भीष्मांनी मोठ्याने शंख फुंकिला ।। 12।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, संजयाने धृतराष्ट्राला असे सांगितले की, जेव्हा दुर्योधन म्हणाला की, चहूकडून भीष्मांचे संरक्षण करावे. यांना माझ्याप्रमाणेच मानावे. यांच्यामुळेच आमचा हा सर्व सेनाभार समर्थ झालेला आहे, आमच्या सेनेची सर्व मदार यांच्यावरच आहे तेव्हा त्याच्या भाषणाने सेनापती भीष्मांना संतोष झाला. मग त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. ती दोन्ही सैन्यात विलक्षण दुमदुमत राहिली. तिचा प्रतिध्वनीही आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला. तो प्रतिध्वनी उठत असताच वीरवृत्तीच्या बलाने स्फुरण येऊन भीष्मांनी आपला शंख वाजवला. ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या. त्यावेळी जणू काय आकाशच तुटून पडते की काय असे वाटले. त्यामुळे आकाश गडगडू लागले, सागर उसळला आणि स्थावर व जंगम थरथर कापू लागले. त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दऱ्या दणाणून गेल्या. इतक्यात त्या सैन्यात रणवाद्ये वाजू लागली. त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग आणि कर्णा ही सर्व वाद्ये एकदम वाजवण्यात आली. त्यांचा भयंकर आवाज झाला.
क्रमश:








