पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपरोधिक टिप्पणी : जोधपूरमध्ये दंगली होत असताना मुख्यमंत्री काय करत होते?
वृत्तसंस्था /जोधपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी राजस्थानातील जोधपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित शासकीय कार्यक्रमासाठी अनुपस्थित राहिलेले मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर मोदींनी उपरोधिक टीका केली आहे. शासकीय कार्यक्रमातून मुख्यमंत्री गेहलोत गायब होते, कदाचित मोदी येईल आणि सर्वकाही ठीक होईल असा विश्वास त्यांना वाटत असावा. अशा स्थितीत अशोक गेहलोत यांनी आराम करावा, आम्ही राजस्थान सांभाळू असे त्यांना सांगू इच्छितो असे उद्गार मोदींनी काढले आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी जोधपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या कामाचा शुभारंभ केला, हे टर्मिनल 480 कोटी रुपयांच्या निधीतून तयार केले जाणार आहे. तसेच जोधपूर आयआयटीला देशाला समर्पित करण्यात आले आहे. याचबरोबर सुमारे 5 हजार कोटी रुपयांचे आरोग्य, शिक्षण, रेल्वे आणि रस्तेमार्गाशी निगडित प्रकल्पांचे नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. केंद्र सरकार राजस्थानच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. परंतु 5 वर्षांमध्ये काँग्रेसच्या कुशासनाने दंगली अन् दलित तसेच महिलाविरोधी अत्याचार, भ्रष्टाचारात राजस्थानला टॉपवर पोहोचविले आहे. राजस्थानला उद्ध्वस्त करण्यासाठी जनतेने काँग्रेसला मतदान केले नव्हते, असे मोदींनी म्हटले आहे. राजस्थानला पर्यटनाला पहिल्या क्रमांकाचे राज्य म्हणून ओळख प्राप्त करून देण्याचा भाजपचा संकल्प आहे. हा संकल्प लोकांच्या मतांद्वारे पूर्ण होऊ शकतो. लोकांच्या मताच्या शक्तीद्वारे राजस्थानात भाजपचे सरकार येईल आणि राजस्थान पर्यटनात पहिल्या क्रमांकावर झेप घेईल, असा दावा मोदींनी केला आहे.
रोजगारनिर्मिती
काँग्रेसच्या पेपर लीक माफियांनी राजस्थानातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याचे नुकसान केले आहे. राजस्थानातील युवा आता न्यायाची मागणी करत आहेत. निवडणुकीच्यावेळी बेरोजगार भत्त्याचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेस सरकारने युवांना पेपर लीक माफियांच्या स्वाधीन केले आहे. भाजप राज्यात सत्तेवर आल्यावर पेपर माफियांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन मोदींनी दिले आहे.
काँग्रेसचे तुष्टीकरणाचे धोरण
राजस्थानातील कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याने येथील व्यापाराला मोठा फटका बसला आहे. अशा स्थितीत काँग्रेसला केवळ स्वत:च्या मतपेढीची चिंता आहे. जोधपूरमध्ये दंगली होत असताना मुख्यमंत्री काय करत होते? हिंसा होत असताना आणि निर्दोष लोक मारले जात असताना काँग्रेसचे नेते काय करत होते असा प्रश्न मोदींनी उपस्थित जनसमुदायाला उद्देशून विचारला आहे.
काँग्रेसकडून ‘भारता’चा विरोध
अमेरिका, जपान, सिंगापूर, जगात भारताचे कौतुक होत असल्याने काँग्रेसला पोटशूळ आला आहे. भाजप सरकारने देशाला 10 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असण्याचा मान मिळवून दिला आहे. काँग्रेसला यामुळेही त्रास होत आहे. काही वर्षांमध्ये मोदी भारताला पहिल्या तीन देशांमध्ये स्थान मिळवून देईल, असे पंतप्रधान म्हणाले.
इंडिया मेड व्हॅक्सीन
भारताने कोरोना लस तयार करत जगातील कोट्यावधी लोकांचे जीवन वाचविले ही अभिमानाची बाब आहे. परंतु काँग्रेसला या मेड इन इंडिया व्हॅक्सीनबद्दलही त्रास होत आहे. आमचे प्रयत्न, वैज्ञानिकांची चर्चा होत आहे. सध्या वॅक्सीन वॉर नावाचा चित्रपट आला असून यात वैज्ञानिकांची मेहनत दाखविण्यात आल्याचे मोदी म्हणाले.
काँग्रेसकडून केवळ खुर्चीचा खेळ
राजस्थानातील लाल डायरीचा विषय अत्यंत चर्चेत राहिला आहे. लाल डायरीत काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे प्रत्येक कृष्णकृत्य नमूद असल्याचे लोक म्हणतात. लाल डायरीतील हे काळे कारनामे जनतेसमोर उघड केले जावेत. बेईमानांना शिक्षा होणे गरजेचे आहे. परंतु राज्यातील काँग्रेस सरकार लाल डायरीतील रहस्य समोर येऊ देणार नाही. हे सत्य समोर येण्यासाठी राज्यात भाजपची सत्ता येणे आवश्यक असल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे.









