केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतांवर तुष्टीकरणाचा आरोप मंगळवारी केला आहे. गेहलोतांनी तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. उदयपूरमध्ये दिवसाढवळ्या कन्हैयालाल यांची हत्या करण्यात आली. तर राज्यात महावीर जयंती आणि रामनवमीवर बंदी घालण्यात आली. राजस्थानात पीएफआयच्या रॅली सर्रास होत असल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.
राजस्थानातील पेपर लीक प्रकरणावरूनही शाह यांनी गेहलोत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. काँग्रेस सरकारने पेपर लीकचा विक्रमच केला आहे. जलजीवन मिशनच्या नावावर काँग्रेस सरकारने 20 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. अशोक गेहलोतांना लोक जादूगार म्हणतात, या जादुगाराने राजस्थानातील सर्वकाही हडप केले आहे. गेहलोतांनी जादू करून राज्यातील वीज गूल केली असल्याची टीका शाह यांनी केली.
काँग्रेस राजस्थानात पुन्हा सत्तेवर आल्यास पीएफआयपासून कुणीच वाचू शकणार नाही. राजस्थानच्या नागौर भागातील सर्वाधिक लोक सैन्यात आहेत. या सैनिकांनी काँग्रेसचे केंद्रात सरकार असताना वन रँक वन पेन्शनची मागणी केली होती. परंतु काँग्रेसने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्षच केले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने वन रँक वन पेन्शनची मागणी मान्य करत सर्व सैनिकांच्या खात्यांमध्ये एकाचवेळी 40 हजार कोटी रुपये जमा केले आहेत, असा दावा शाह यांनी केला आहे.
2004-14 दरम्यान काँग्रेस केंद्रात सत्तेवर होता, या कालावधीत राजस्थानच्या सरकारला केंद्राकडून किती रक्कम मिळाली याचे उत्तर गेहलोतांनी द्यावे. परंतु ते याचे उत्तर देऊ शकणार नाहीत याची कल्पना आहे. 2004-14 दरम्यान राजस्थानला 2 लाख कोटी रुपये मिळाले. तर आमच्या सरकारने मागील 9 वर्षांमध्ये राजस्थानला 8 लाख 71 हजार कोटी रुपये दिले असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
आमच्या सरकारने राजस्थानच्या 80 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हजार कोटी रुपये दिले आहेत. राज्यातील एक कोटी 5 लाख लोकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळाला आहे. राजस्थानच्या 86 लाख घरांमध्ये शौचालयांची निर्मिती करविण्यात आली आहे. तर 4 कोटीहून अधिक गरीबांना दर महिन्याला 5 किलो मोफत धान्य दिले जातेय. 18 लाख गरीबांना पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत घर बांधून देण्यात आल्याचा दावा शाह यांनी केला आहे.









