अग्रसेन गेहलोत विरोधात वर्षभरात दुसऱयांदा कारवाई
वृत्तसंस्था/ जोधपूर
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या घरी आणि अन्य ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. 2007-09 दरम्यान फर्टिलायजर शेतकऱयांना पुरविण्याच्या नावावर सरकारकडून अनुदानित दरात पोटॅश खरेदी केले आणि उत्पादन खासगी कंपन्यांना विकून नफा कमविल्याचा आरोप अग्रसेन गेहलोत यांच्यावर आहे.
याप्रकरणी ईडीकडून देखील चौकशी करण्यात येत आहे. कस्टम विभागाने अग्रसेनच्या कंपनीवर सुमारे 5.46 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. अग्रसेन यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ईडीशी निगडित प्रकरणात त्यांच्य अटकेला स्थगिती दिली होती. आता याप्रकरणी सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.
गेहलोत यांचे बंधू अग्रसेन यांच्या ठिकाणांवर शुक्रवारी सकाळी सीबीआयचे पथक पोहोचले. सीबीआयच्या टीममध्ये 5 अधिकारी हे दिल्लीतील तर 5 अधिकारी जोधपूरमधील आहेत. छाप्यांदरम्यान कुणालाही आत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले आहे.
अग्रसेन गेहलोत यांची अनुपम कृषी ही कंपनी म्यूरियेट ऑफ पोटॅश (एमओपी) फर्टिलायजरच्या निर्यातीवर बंदी असूनही त्याच्या निर्यातीत सामील होती. एमओपीची आयात इंडियन पोटॅश लिमिटेडकडून (आयपीएल) केली जाते आणि शेतकऱयांना अनुदानित दरात त्याची विक्री केली जाते.
अग्रसेन गेहलोत हे पूर्वी आयपीएलचे अधिकृत वितरक होते. 2007 ते 2009 दरम्यान त्यांच्या कंपनीने अनुदानित दरात एमओपीची खरेदी केली, परंतु ते शेतकऱयांना विकण्याऐवजी अन्य कंपन्यांना विकले. या कंपन्यांनी एमओपीला इंडस्ट्रियल सॉल्टच्या नावार मलेशिया आणि सिंगापूरमध्ये पोहोचविले होते.
डायरेक्ट्रोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेन्सने 2012-13 मध्ये खत घोटाळय़ाचा खुलासा केला होता. कस्टम विभागाने अग्रसेन यांच्या कंपनीवर सुमारे 5.46 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.









