सचिन पायलटांच्या सहभागावर संशय
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानात यंदा विधानसभा निवडणूक होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष सक्रीय झाले आहेत. राज्यभरात नेत्यांचे दौरे वाढले असून निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळय़ा रणनीति आखल्या जात आहेत. राज्घ्स्थान काँग्रेसकडून 19 एप्रिल रोजी जयपूरमध्ये एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यशाळेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रदेश काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना आणि पक्षसंघटनेच्या आगामी कामकाजावरून चर्चा होणार आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट या कार्यशाळेत सहभागी होण्याची शक्यता कमी आहे.
17, 18 आणि 20 एप्रिल रोजी मुख्यमंत्री गेहलोत हे काँग्रेस आमदारांसोबत ‘वन टू वन’ चर्चा करतील. विविध विभागातील आमदारांना वेगवेगळय़ा दिवशी बोलाविण्यात आले आहे. 17 एप्रिल रोजी अजमेर, टोंक, नागौर, जोधपूर, जैसलमेर, बाडमेर, पाली, सिरोही, जालोर आणि भीलवाडा येथील आमदार अन् इच्छुक उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. 18 एप्रिल रोजी उदयपूर, चित्तौडगढ, डुंगरपूर, बांसवाडा, राजसमंद, कोटा, बारां, बूंदी, झालावाड, भरतपूर, धोलपूर, करौली आणि सवाई माधोपूर येथील आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. अशाच प्रकारे 20 एप्रिलला उर्वरित आमदारांना बोलाविले गेले आहे.
आमदार अन् इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा करत मुख्यमंत्री गेहलोत हे स्थानिक मुद्दय़ांविषयी माहिती प्राप्त करणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या योजनांचा अधिकाधि प्रचार करण्याचा निर्देश या आमदारांना दिला जाणार आहे. तसेच प्रचाराविषयी महत्त्वाच्या सूचना केल्या जातील.
सचिन पायलट हे टोंकचे आमादर आहेत. टोंकच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांसोबन वन टू वन संवाद कार्यक्रम 17 एप्रिल रोजी होणार आहे. त्यादिवशी पायलट हे शाहपुरा आणि झुंझुनू दौऱयावर असणार आहेत. अशा स्थितीत पायलट हे या संवाद कार्यक्रमात सामील होण्याची शक्यता कमी आहे.