जयपूर / वृत्तसंस्था
राहुल गांधींची पदयात्रा राजस्थानमधून बाहेर पडल्यानंतर त्वरित पुन्हा एकदा काँगेसमधील मतभेद चव्हाटय़ावर आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि युवा नेते सचिन पायलट यांच्यात संघर्ष उफाळून आला आहे. पायलट यांनी गेहलोत यांच्यावर शरसंधान केले असून राज्यात दौऱयांना प्रारंभ केला आहे.
राजस्थानात सरकारचे कशावरही नियंत्रण नाही. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटत आहेत. अनेकदा परीक्षाच रद्द कराव्या लागत आहेत. विद्यार्थ्यांचा सरकारवरचा रोष वाढीला लागला आहे. मुख्यमंत्री आपल्या कोशात असून यांचे कशाकडेही लक्ष नाही, अशी टीका पायलट यांनी मुख्यमंत्र्यांचे थेट नाव न घेता केली. त्यांनी राज्याच्या विविध भागांमध्ये आपला संदेश पसरविण्यासाठी प्रचार अभियान हाती घेतले असून गेहलोत यांच्यावरचा दबाव वाढविण्यास प्रारंभ केला आहे.
पायलट यांनी राजस्थानच्या दौऱयाचा व्यापक कार्यक्रम आखला असून गेहलोत गटानेही त्यांच्या डावपेचांना प्रत्युत्तर देण्याची तयारी चालविली आहे. गेहलोत पायलट यांचा प्रत्येक डावपेच हाणून पाडण्यास सक्षम आहेत, अशी भाषा गेहलोत गटातील एका मंत्र्याने केली. दोन्ही गट आपापले बळ वाढविण्याच्या प्रयत्नांमध्ये असून सध्यातरी गेहलोत गटाचे पारडे जड असल्याचे दिसून येते.









