गजेंद्रसिंह शेखावत यांच्यावरील आरोपांप्रकरणी सुनावणी
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कनिष्ठ न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी मंगळवारी राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. कनिष्ट न्यायालयाने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना याप्रकरणी 7 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यावर संजीवनी घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप केला आहे. तसेच शेखावत यांचे आई-वडील, पत्नी आणि मेहुण्यांचा सहभाग असल्याचेही वक्तव्य केले होते. शेखावत यांनी घोटाळ्याचा पैसा इतर देशांमध्ये ठेवला आहे, असे अशोक गेहलोत म्हणाले होते. त्यानंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी गेहलोत यांच्यावर फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला.
संजीवनी घोटाळ्याची राजस्थानच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. संजीवनी सहकारी संस्थेचे कार्यालय जोधपूरमध्ये असून कार्यक्षेत्रही बहुतेक त्याच विभागात आहे. या प्रकरणात गेहलोत आणि शेखावत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची दीर्घ मालिका सुरू आहे.









