वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विद्यमान आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे आश्चर्याचा सुखद धक्का देणारे असतील, असे भाकित रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केले आहे. या तिमाहीत कर्जउचलीच्या प्रमाणात मोठी वाढ दिसून आली आहे. तसेच बाजारात मागणीही समाधानकारकरित्या वाढल्याचे पहावयास मिळत आहे. साहजिकच, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढले असल्याचे सर्व संकेत मिळत आहेत. म्हणून दुसऱ्या तिमाहीचे आकडे निश्चितच सकारात्मकदृष्ट्या आश्चर्यकारक असतील असे दास यांनी एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे आर्थिक क्षेत्रात उत्सुकता वाढली आहे. विशेषत: उद्योग क्षेत्र या संभाव्य आकडेवारीकडे लक्ष ठेवून आहे.









