ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (GDP) वेग मंदावणार आहे. मार्च 2022 ला संपणाऱ्या आर्थिक वर्षात GDP वाढीचा दर 9.5 टक्के असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ म्हणाल्या, यापूर्वी भारतीय GDP वाढीचा दर 12.5 टक्के असेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सांगण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी खीळ बसणार असून, हा विकासदर 3 टक्क्यांनी खाली येऊन 9.5 टक्के असेल. जीडीपी वाढीचा वेग मंदावण्याचे मुख्य कारण म्हणजे देशातील लसींचा तुटवडा आणि नव्या लाटेचा धोका हे आहे. भारतासह फिलिपिन्स, थायलंड, मलेशिया यासारख्या देशांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.









