शासनात नसणार कुठलीच भूमिका : गाझापट्टीची सूत्रे समितीकडे असणार
वृत्तसंस्था/ गाझापट्टी
इस्रायल आणि हमास यांच्यात दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाला शनिवारी गाझामध्ये युद्धविराम लागू झाला. युद्ध पूर्णपणे समाप्त झाल्यावर गाझाचे शासन कोण सांभाळणार असा प्रश्न आता उभा ठाकणार आहे. याचदरम्यान हमासच्या चर्चा समितीच्या सूत्राने युद्धोत्तर गाझाच्या शासनात हमासची कुठलीच भूमिका नसेल असे सांगितले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायल-हमास युद्धविराम प्रस्ताव अंमलात आला असून दोन्ही बाजू ट्रम्प यांची 20 सूत्री योजना लागू करण्यावर चर्चा करत आहेत. या योजनेत हमासचे निशस्त्राrकरण आणि युद्धोत्तर गाझाच्या संचालनात या संघटनेला सामील न करण्याची तरतूद आहे. हमाससाठी गाझापट्टीच्या शासनाचे दरवाजे आता बंद झाले आहेत. हमास संक्रमणकालीन टप्प्यात कुठल्याही स्वरुपात सामील होणार नाही. हमास दीर्घकाळापर्यत युद्धविरामाला तयार असून यादरम्यान स्वत:च्या शस्त्रास्त्रांचा वापर करणार नाही असे ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवर सूत्राकडून सांगण्यात आले. यापूर्वी हमासच्या एका अधिकाऱ्याने संघटनेचे निशस्त्राrकरण पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याची टिप्पणी केली होती.
ट्रम्प यांच्या 20 सूत्री योजनेच्या पहिल्या हिस्स्यात गाझाला ‘कट्टरवाद आणि दहशतवादापासून मुक्त क्षेत्र’ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाझा स्वत:च्या शेजारी देशांसाठी कुठल्याही प्रकारे धोका ठरू नये असे यात म्हटले गेले आहे. योजेनेनुसार हमासचे गाझाच्या भविष्यातील शासनात कुठलेच स्थान नसेल. तसेच हमासकडील सैन्यसुविधा नष्ट करण्याची तरतूद योजनेत आहे. सार्वजनिक सेवांच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी एक तात्पुरती, तांत्रिक आणि बिगर-राजकीय पॅलेस्टिनी समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीच्या स्वरुपावर सहमती निर्माण व्हावी म्हणून मध्यस्थांकडून चालू आठवड्याच्या अखेरीस बैठक बोलाविली जाणार आहे. हमासने अन्य गटांसोबत मिळून 40 नावे सुचविली आहेत. यातील कुठलाही व्यक्ती हमासचा सदस्य नसल्याचे समजते.









