वृत्तसंस्था / मुंबई
2025 च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेतील नव्या मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर झालेल्या प्रकाशझोतातील पाचव्या सामन्यात ख्रिस गेल आणि ड्वेन स्मिथ यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर विंडीज मास्टर्सने इंग्लंड मास्टर्सचा 8 धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील विंडीज मास्टर्स संघाचा हा दुसरा विजय आहे.
या टी-20 स्पर्धेतील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीज मास्टर्स संघाने 20 षटकात 6 बाद 179 धावा जमविल्या. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. ख्रिस गेल आणि ड्वेन स्मिथ या सलामीच्या जोडीने आक्रमक फलंदाजी करताना केवळ 7 षटकात 77 धावांची भागिदारी केली. लाराच्या जागी विंडीज मास्टर्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या गेलने 19 चेंडूत 39 धावा तर स्मिथने 25 चेंडूत जलद 35 धावा झळकविल्या. गेलच्या खेळीमध्ये 4 षटकारांचा आणि 3 चौकारांचा समावेश होता. स्मिथने 2 षटकार आणि 4 चौकार ठोकले. इंग्लंडच्या स्कोफिल्डने विंडीजची ही सलामीची जोडी फोडण्यात यश मिळविले. विंडीजची 10 षटकाअखेर 2 बाद 90 अशी होती. पण त्यानंतर इंग्लंडच्या मॉन्टी पनेसरने 3 गडी बाद केल्याने विंडीजने 15 षटकाअखेर 5 बाद 113 धावा जमविल्या. देवनरेन आणि अॅस्ले नर्स यांनी सहाव्या गड्यासाठी 44 धावांची भागिदारी केली. देवनरेनने 23 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 35 तर नर्सने 2 षटकार आणि 2 चौकारांसह 13 चेंडूत 29 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे पनेसरने 14 धावांत 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंड संघातील फिल मस्टर्डने 19 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 35 तर कर्णधार मॉर्गनने 13 चेंडूत 4 चौकार 1 षटकारासह 22 धावा जमविल्या. 10 षटकाअखेर इंग्लंडने 5 बाद 76 धावा जमविल्या. इंग्लंडच्या स्कोफिल्ड आणि ट्रेमलेट या जोडीने सातव्या गड्यासाठी 52 धावांची भागिदारी केली. स्कोफिल्डने 5 चौकारांसह 26 चेंडूत 32 धावा जमविल्या. मस्टर्डने 35 धावांचे योगदान दिले. रवी रामपाल आणि जेरोमी टेलर यांनी इंग्लंडचे पहिले तीन फलंदाज बाद केले. त्यानंतर सुलेमान बेन आणि नर्स यांनी इंग्लंडचे तीन गडी बाद केले. इंग्लंडला शेवटच्या षटकात विजयासाठी 18 धावांची जरुरी होती. इंग्लंडच्या स्टुअर्ट मितेरने 10 चेंडूत 24 धावा जमविल्या. क्रेमलेटने 19 चेंडूत 26 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : वेंडीज मास्टर्स 2 षटकात 6 बाद 179 (गेल 39, डी. स्मिथ 35, पनेसर 3-14), इंग्लंड मास्टर्स 20 षटकात 8 बाद 171 (फिल मस्टर्ड 35, स्कोफिल्ड 32, स्टुअर्ट मिकेर 24, ट्रेमलेट 26, सुलेमान बेन 2-11)









