वृत्तसंस्था / बेसील
स्वीसमध्ये सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2025 च्या स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या गायत्री गोपिचंद आणि त्रिशा जॉली यांनी महिला दुहेरीची दुसरीफेरी गाठली आहे. महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात त्रिशा आणि गायत्री यांनी स्वीसची अॅलिने मुलेर आणि हॉलंडची ब्युटेन यांचा 21-16, 21-17 अशा सरळ गेममध्ये केवळ 32 मिनिटांत फडशा पाडला. गायत्री आणि त्रिशा यांची दुसऱ्या फेरीत गाठ जर्मनीच्या हुबेश आणि लिमेन यांच्याशी होणार आहे. महिलांच्या दुहेरीत भारताच्या प्रिया आणि श्रुती मिश्रा तसेच वर्षनी आणि श्रीआरती यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. तुर्कीच्या नेझलिकेन इनेसी आणि इरसेटीन यांनी प्रिया आणि श्रुती यांचा 21-11, 21-19 तसेच नेदरलँड्सच्या डेबोरा जेली आणि डेन्मार्कच्या सारा यांनी वर्षनी व श्रीआरती यांचा 21-13, 21-13 असा पराभव केला.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 300 सुपर दर्जाच्या स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि शंकर सुब्रमणीयन यांनी पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविताना पात्रता फेरीतील सामने जिंकले. पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये भारताचे एच. एस. प्रणॉय, प्रियांश राजवत आणि किरण जॉर्ज यांनी स्थान यापूर्वीच मिळविले आहे. तसेच किदांबी श्रीकांतलाही प्रमुख ड्रॉमध्ये संधी उपलब्ध झाली आहे.









