सन्मान जागतिक भाषातज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांच्यासह मान्यवरांची सांगलीत उपस्थिती
सांगली दि. – फुले, शाहू, आंबेडकरी मानवमुक्तीच्या चळवळीतील ज्येष्ठ कृतीशील, विवेकवालदी विचारवंत साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचा ७५ री निमित्त त्यांनी शिक्षण, समाजशिक्षण, शैक्षणिक, वैचारिक, साहित्यिक, सामाजिक, कर्मचारी चळवळीमधे दिलेले योगदान आणि दलित पँथर, मास मुव्हमेंट, प्रशिक विद्यार्थी संघटना, फास्टा, सेक्युलर एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, सेक्युलर मुव्हमेंट, सेक्युलर आर्ट मुव्हमेंट या विविध संस्था-संघटनांच्या माध्यमातून केलेल्या कार्याच्या गौरवार्थ रविवार, २५ फेब्रुवारी रोजी सांगलीत सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक भाषातज्ञ, पद्मश्री डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास आमदार अरुण लाड, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत लक्ष्मीकांत देशमुख, प्रदीप दुसाद, पुणे, नवभारत शिक्षण संस्थेचे संचालक गौतम पाटील, उद्योजक अॅड. सी. आर. सांगलीकर, यांची प्रमुख उपस्थिती असुन वक्ते म्हणून साहित्यिक डॉ. राजन गवस, फुले-शाहू-आंबेडकर टिचर्स असोसिएशन, (फास्टा) कोल्हापूरचे अध्यक्ष प्रा. डॉ. भरत नाईक, मुंबई माजी पोलीस उपायुक्त आणि सेक्युलर मुव्हमेंटचे महाराष्ट्र संघटक भरत शेळके, सेक्युलर मुव्हमेंट सांगली जिल्हा अध्यक्ष प्रा कैलास काळे आणि नाशिकहून ज्येष्ठ कार्यकर्ते करुणासागर पगारे हे वक्ते आपले मनोगत व्यक्त करतील.
या निमित्ताने सकाळी १०.३० वाजता मा. कुलगुरू डॉ डी. टी. शिर्के, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातील मान्यवर अभ्यासकांच्या लेखांचा संपादित संग्रह, मानवमुक्तीचा पथदर्शक आणि महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील सहकार्यांनी प्रा गौतमीपुत्र कांबळे यांच्या घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीवर आधारित संवाद मानवमुक्तीच्या प्रवाहाशी… या दोन पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लेखक समिक्षक प्रा. अविनाश सप्रे, प्रा.डॉ. रणधीर शिंदे, सतीश बनसोडे आणि अलोक जत्राटकर यांची उपस्थिती आहे. सकाळी ११.३० ते ०१.३० दुसर्या सत्रात सांस्कृतिक युध्द/लढा समजून घेताना. या विषयावर पद्मश्री डॉ. गणेश देवी यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित केला आहे. यामधे महाराष्ट्र श्रमिक मुक्ती दल अध्यक्ष डॉ भारत पाटणकर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधील राज्यशास्त्राचे प्रा डॉ. प्रकाश पवार, महाराष्ट्र विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव, मुंबईस्थित ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे, क्युरेटर तथा दृश्यकलावंत प्रभाकर कांबळे, मुंबई हे विविध क्षेत्रातील विवेकवादी कार्यकर्ते – अभ्यासक वक्ते म्हणून सहभागी होत आहेत. संपूर्ण सन्मान सोहळ्याचे आयोजन प्रा गौतमीपुत्र कांबळे सन्मान समिती आणि नवभारत शिक्षण संस्था संचालित शांतिनिकेतन लोकविद्यापीठ मार्फत लोकरंगभुमी, शांतिनिकेतन लोकविद्यापीठ, वसंतदादा कारखान्यासमोर, माधवनगर रोड येथे संपन्न होत आहे.








